। मुंबई । प्रतिनिधी ।
सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शाळेच्या व्यवस्थापनाने प्रभात फेरीने सुरवात केली व त्यानंतर क्रीडा मोहत्सवाला सुरवात करण्यात आली आहे.
माहीम येथील सरस्वती मंदिर हायस्कूलच्या मैदानावर आयोजित आंतरशालेय लंगडी स्पर्धेला सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशी मुलींचे तर दुसर्या दिवशी मुलांचे सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या मुलींच्या स्पर्धेत उपांत्यफेरीतील सामन्यांमध्ये रंगतदार खेळ पाहायला मिळाला. या सामन्यांमधून सरस्वती मंदिर हायस्कूल आणि श्री गणेश विद्यालय यांनी आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
पहिला उपांत्यफेरी सामना
पहिल्या उपांत्यफेरीत सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्यामंदिरचा 26-12 असा 14 गुणांनी पराभव केला. सरस्वती मंदिरच्या गौरी कांबळे, वैदवी बटावले, अपूर्वा मुळीक यांनी जोरदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. तर, पराभूत अहिल्या विद्या मंदिरच्या नईला शेख, ध्रुवी गोलार यांनी दिलेली लढत अंतिम फेरीसाठी अपुरी ठरली.
दुसरा उपांत्यफेरी सामना
दुसर्या उपांत्यफेरीच्या सामन्यात श्री गणेश विद्यालयाने वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलचा 23- 21 असा 2 गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्री गणेश विद्यालयाच्या वेदांगी भुरवन, श्रुतिका मोरे, मानसी बूनेसर यांनी आपल्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. तर, पराभूत वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलच्या अंकिता वाकोडे, खुशी थोरले यांनी चमकदार खेळ केला. परंतु, विजयासाठी केलेला खेळ पुरेसा ठरला नाही.