मोहोपाड्यात शोभायात्रेचे आयोजन

| रसायनी । वार्ताहर ।
रसायनीत श्री राम जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. रसायनीतील विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाजातर्फे शिवनगर येथील श्री गणेश मंदिरात मूर्ती पूजन करून रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ बप्पाजी खेडकर यांच्या हस्ते श्रीरामाचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.

शोभायात्रेसाठी श्रीरामाच्या प्रतिमेसह आकर्षक गाडी सजविण्यात आली होती. यावेळी परिसरातील वारकरी संप्रदायानेही भजनाचा ताल धरला होता. चांभार्ली थांब्याजवळ दांडपट्टा व पारंपरिक काठी फिरविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मोहोपाडा बाजारपेठ श्री रामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली, सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. मोहोपाडा श्री राम मंदिरात पालखी पोहचल्यानंतर श्रीरामाची आरती झाल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

Exit mobile version