महिला वर्गासह तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
। महाड । प्रतिनिधी ।
महाड विधान मतदारसंघातील मविआ पुरस्कृत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळी महाड शहरातील साळीवाडा नाका ते जय आंबे कॉर्नर नवेनगरपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॅलीत महिला वर्गासह तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बाजारपेठेतील व्यवसायिक व दुकानदारांसह घरातल्या सदस्यांची भेट घेतली.
दरम्यान, साळीवाडा नाका येथील माझी नगरसेवक वझीरभाई कोंडीवकर यांच्या निवासस्थानी झालेल्या महिला मेळाव्यात बोलताना स्नेहल जगताप यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसात प्रचारादरम्यान व गाव भेटीदरम्यान महिला वर्गासह मतदारांचा मिळणारा प्रतिसाद ही परिवर्तनाची नांदी आहे. या निवडणुकीत परिवर्तन होत विकसित महाड मतदारसंघ घडवण्याचे कार्य माझ्या हातून होणार आहे. तसेच, महिला वर्गांसाठी विशेष योजना अमलात आणणार असल्याची ग्वाहीदेखील या बैठकीदरम्यान दिली आहे.
या बैठकीनंतर साळीवाडा नाका येथून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये महाड शहरातील हजारो नागरिक सहभागी होत ही विजयाची रॅली असल्याचे दाखवून दिले. यावेळी उमेदवार स्नेहल जगताप यांच्या समावेत श्रेयस जगताप, संध्या जगताप, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.