नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जगभरामध्ये करोनाच्या साथीने थैमान घातलेलं असतानाच आता जगासमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये घातक अशा मारबर्ग विषाणूचा संसर्ग झालेला पाहिला रुग्ण आढळून आला आहे. जागितक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओने यासंदर्भातील माहिती दिली आहे. हा विषाणू इबोला आणि करोनापेक्षाही अधिक घातक असल्याचं मानलं जात आहे. या विषाणूचा संसर्ग प्राण्यांमधून मानवामध्ये होऊ शकतो. मारबर्गचा रुग्ण आढळून आल्याने गिनीमधील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूचा संसर्ग वटवाघळांच्या माध्यमातून होते. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मरण पावण्याचं प्रमाण हे 88 टक्के इतकं आहे. 2 ऑगस्ट रोजी दक्षीण गुएकेडॉ प्रांतामध्ये एका रुग्णाचा या विषाणूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृत्यनंतर केलेल्या चाचण्यांमध्ये त्याच्या शरीरात हा विषाणू आढळून आला. शवविच्छेदन अहवालामध्ये या व्यक्तीच्या शरीरात इबोलाचा विषाणू आढळून आला नसल्याचं उल्लेख आहे. इबोलाऐवजी या व्यक्तीच्या शरीरात मारबर्ग विषाणू आढळून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे.