400 हून अधिक सामने खेळवण्याचा मानस
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (दि.4) 2025 ते 2029 या चार वर्षांसाठी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची साधारण रुपरेषा काय असेल, हे जाहीर केले आहे. आयसीसीने 2025-2029 साली फ्यूचर टूर्स प्रोग्राम घोषित केला असून यात आयसीसी महिला चॅम्पियनशीपच्या चौथ्या पर्वाचाही समावेश आहे.
गेल्या काही काळापासून एकदिवसीय प्रकारत आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा खेळवत आहे. यानुसार दर चार वर्षांनी होणार्या एकदिवसीय विश्वचषक पात्रता ठरवण्यात येते. दरम्यान, आता चौथ्या पर्वातून 2029 महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रता ठरवण्यात येणार आहे. यंदाच्या पर्वात 11 संघ सहभागी होत आहेत. आत्तापर्यंत 10 संघात महिला अजिंक्यपद स्पर्धा खेळवली जात होती. पण आता चौथ्या पर्वातून झिम्बाब्वेचा महिला संघ या स्पर्धेत पदार्पण करत आहे.
या स्पर्धेत भारतीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या संघाविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. तसेच न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्याविरुद्ध त्यांच्या देशात जाऊन मालिका खेळायच्या आहेत. याशिवाय फ्यूचर टूर्स प्रोग्राम 2025-2029 नुसार महिला क्रिकेटमध्ये 400 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने चार वर्षात खेळवले जाणार आहेत. याचबरोबर प्रत्येकवर्षी आयसीसी स्पर्धा होणार आहेत.
2025 मध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. यानंतर 2026 मध्ये महिला टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. 2027 मध्ये महिला अजिंक्यपद चषक स्पर्धा खेळवली जाईल, तर 2028 मध्ये महिला टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे.
दरम्यान, आयसीसीच्या स्पर्धांपूर्वी देशांचे बोर्ड परस्पर संमतीने तिरंगी मालिकाही खेळवणार आहेत. टी-20 विश्वचषक 2026 पूर्वी भारत आणि न्यूझीलंड इंग्लंड दौरा करणार असून या तीन संघात टी-20 मालिका होईल. तसेच, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज आयर्लंडमध्ये तिरंगी मालिका खेळणार आहेत. 2027 आणि 2028 मध्ये अनुक्रमे श्रीलंका आणि वेस्ट इंडिज येथे तिरंगी मालिका होणार आहेत. याशिवाय येत्या 4 वर्षात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज अशा संघासोबतही अनेक संघ कसोटी सामने खेळताना दिसणार आहेत.