पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका भाताचे कोठार म्हणून संबोधला जात होता. या तालुक्यातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन भाताची शेती आहे. भाताच्या शेतीमधून विक्रमी उत्पादन करणारे शेतकरी कर्जत तालुक्यात आहेत. मात्र, हे सर्व शेतकरी यावर्षीच्या खरीप हंगामातील पावसाच्या अनियमितता यामुळे संकटात आले आहेत. भाताची शेती पाऊस सप्टेंबर महिन्याचे अर्ध्यावर आपल्या परतीच्या प्रवासाला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, आतातर भाताची पिके शेतातच करपून जाऊ लागली असून शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट डोकावत आहे. मात्र, शासनाने कर्जत तालुका दुष्काळी जाहीर केलेला नाही आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे देखील केले जात नाही.
तालुक्यात यावर्षी साधारण 9000 हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली गेली आहे. भाताचे क्षेत्र यापेक्षा जास्त आहे, पण यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात भाताची रोपे उगवली नाहीत. तेव्हापासून शेतकरी अडचणीत येऊ लागला होता. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक परिस्थितीवर मात करून भाताची शेती केली, त्या शेतकऱ्यांच्या पिकाची पूर्ण तयारी होण्याची वेळ आली आणि पाऊस गायब झाला. अनेक वर्षांनी यावर्षी खरीप हंगामात भाताचे पिक चांगले बहरले होते. 15 सप्टेंबर नंतर आजपर्यंत पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे भाताचे पिक शेतात पिवळे धमक होण्याऐवजी आजही हिरवेगार आहे. भाताची कोंब तयार होण्याची कृती यावर्षी सप्टेंबर महिन्यात सुरू झाली आणि त्याच काळात पाऊस कर्जत तालुक्यातून निघून गेला. त्यामुळे भाताचे कोंब पूर्ण भरात आलेले नाही. तालुक्यातील अर्ध्याहून अधिक भागात तर भाताचे कोंब देखील पावसाच्या जाण्याने तयार झालेले नाहीत. दरम्यान, भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात निर्माण झालेले भाताचे पिक आज अंतिम घटका मोजत आहे. भाताच्या पिकासाठी लागणारे पाणी निसर्गाने दिलेले नाही आणि त्यामुळे भाताची शेती संकटात आली आहे. भाताच्या शेती मधील नुकसान बद्दल तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना यांनी शासनाकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
कर्जत तालुक्यातील माळरानावर आणि डोंगराच्या उतारावर लावलेली शेती धोक्यात आली आहे. त्या या ठिकाणच्या भाताचे पिक शेतात करपून गेले आहे. भाताच्या शेतात दोन इंच एवढी जमीन दुभंगली असून, शेतकरी पावसाच्या पाण्याची वाट पाहत आहे. सखल खोलगट भागातील भाताची शेती आणखी काही दिवस पाऊस झाला नाहीतर ती देखील करपून जाणार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी शासनाकडे आस लावून दुष्काळ जाहीर होतो काय? याकडे डोळे लावले आहेत.
आमच्या सर्व भागातील शेती दुबार पिकाची आहे. मात्र, गतवर्षी मे महिन्यात पाऊस आल्याने रबी शेतीचे पिक घेता आले नव्हते. आता सप्टेंबर महिन्यात पाऊस गेल्याने खरीपमधील पीक घेता येणार नाही.
दशरथ मुने
शेतकरी
नेरळ विविध कार्यकारी सोसायटी आमच्या सोसायटीच्या अंतर्गत येत असलेल्या 35 हून अधिक गावातील शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर भाताची पिकाची नुकसानी लक्षात घेता कर्जत तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे.
राजेंद्र विरले
सभापती
