तालुक्यातील भातशेती संकटात

पावसाअभावी रोपे सुकली


| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातीलच नव्हे तर, संपूर्ण रायगड जिल्ह्यातील भातशेती पावसाने ओढ दिल्याने संकटात सापडली आहे. पावसाअभावी भात खाचरातील लावणी केलेली रोपे सुकून गेल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांवर आपल्या कपाळावर हात मारुन घेण्याची परिस्थिती ओढवली आहे. आधीच अर्धेअधिक कोरड्या गेलेल्या मृग नक्षत्रामुळे लावणीसाठी उशिराने तयार झालेली भात रोपे तर आर्द्रा नक्षत्रात पावसाने घातलेला धुमाकूळ त्यामुळे खोळंबलेली लावणी, त्यानंतर अतिपाण्याने कुजून गेलेली रोपे या सर्व संकटांचा सामना करीत येथील शेतकरी उसंत घेत असतानाच गेले पंधरा दिवसांत तालुक्यात भरपूर पाऊस पडलेलाच नाही. उलट, येथे सकाळपासून कडक ऊन पडत असल्याने शेतीतील पाणी पार सुकून गेले आहे. एवढेच नव्हे तर, उखारु भातशेतीतील जमिनीला अक्षरशः भेगा पडल्या आहेत. लावणी केलेली भाताची रोपे पिवळी पडली आहेत, तर बहुतांशी रोपे वाळून गेली आहेत.

मुरुड तालुक्यात एकूण 3100 हेक्टर भातशेतीचे क्षेत्र असून, त्यातील आजमितीला जवळपास 400 हेक्टर जमीन पडीक, तर 800 हेक्टरहून अधिक खारफुटीने व्यापलेली खाजण जमीन आहे. लहरी हवामान, पावसाची अनियमितता, मजुरीचे वाढते दर, कमी भाव आदी कारणांमुळे शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे. मुरुड तालुक्यात प्रतिवर्षी 2435 मी.मी.च्या सरासरीने पाऊस पडतो. यावर्षी 2 ऑगस्टपर्यंत 1898 मी.मी. पाऊस पडला असला तरी त्यात सातत्य नव्हते. जुलै महिन्यात तो खूपच बरसला, पण ऑगस्ट महिन्यापासून तो गायब झाला आहे. सद्यस्थितीत ढगाळ वातावरणात एखादं दुसरी सर येऊन जमीन भिजवून जात आहे. त्यानंतर पडणाऱ्या कडक उन्हामुळे परिस्थिती ‌‘जैसे थेच’ राहिली आहे. नदी नाले कोरडे पडले आहेत. शेतीतील पाणी पार सुकले असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. रोपे पिवळी पडली आहेत. अजून आठ दिवस पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.

मागील वेळेस भरपूर पाऊस पडल्याने साठलेल्या पाण्यात नुकतीच लावणी केलेली रोपे कुजून गेली आहेत. त्यावर खतांचा उतारा दिला. पण, आता पाऊसच गायब झाल्याने मोठी पंचाईत झाली आहे.

भालचंद्र नाक्ती, शेतकरी-आदाड

माझी स्वतःची शेती नाही, त्यामुळे मी दुसऱ्याची जमीन कसायला घेतो. त्या मालकाला यावर्षी मोबदला कसा द्यायचा? शिवाय, आगामी वर्षासाठी कुटुंबाच्या पोटासाठी भात कुठून आणायचे?

भाई गुंड, शेतकरी, उसरोली
Exit mobile version