| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील धाक्सुद क्रीडा मंडळाने एक अनोखा उपक्रम राबवून येथील महिला भगिनींसाठी खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याला येथील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. रंगलेल्या अटीतटीच्या व चढाओढीच्या पैठणीच्या खेळातील पैठणीच्या विजेत्या ठरल्या सौ ममता नरेश महाडिक तर उपविजेत्या मानसी लोखंडे, सौ मीनाक्षी शिंदे व सौ अश्विनी शिंदे या वहिनी ठरल्या आहेत.
विविध प्रकारच्या व पैठणीच्या खेळात जवळपास ऐंशी हुन अधिक महिला सहभागी झालेल्या होत्या. सदरच्या खेळात कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा अट नसल्याने बहुसंख्येने महिला या खेळात सहभागी झाल्या होत्या.
अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ गावचे अध्यक्ष तुकाराम कोंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच मानसी लोखंडे, सदस्या रिया लोखंडे, सुनील महाडिक, डॉ. श्यामभाऊ लोखंडे, मंगेश लोखंडे सह आदी ग्रामस्थ व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होत.
सौ पूजा लोखंडे यांच्या हस्ते ममता नरेश महाडिक यांना पैठणी देऊन सत्कार करण्यात आला तर उपविजेत्या ठरलेल्या सौ मानसी लोखंडे, सौ अश्विनी शिंदे, सौ मीनाक्षी शिंदे यांना तुकाराम कोंडे, महेश लोखंडे, रायगड पोलीस कु शीतल महाडिक, प्रवीण मरवडे, प्रफुल लोखंडे, दीपेश महाडिक यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, तर उत्साह आणि आनंदायी वातावरनात विजेत्या ठरलेल्या या महिलांचे त्यांच्या कुटूंबियांनी मोठे कौतुक केले व अति उत्साह म्हणून पतीने त्यांना उचलून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच या खेळात सहभागी झालेल्या महिलांना देखील भेट वस्तू देत त्यांचे या मंडळाच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मंडळांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पत्रकार डॉ श्यामभाऊ लोखंडे यांच्याकडून पैठणी देण्यात आली. प्रवीण मरवडे, शीतल महाडिक रायगड पोलीस, प्रफुल महाडिक ,दीपेश महाडिक यांच्या कडून उपविजेत्याना बक्षीस देण्यात आले होते. तर सहभागी झालेल्या सुधीर लोखंडे व अनिल महाडिक यांच्या कडून भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे व पैठणीच्या खेळाचे सुसज्ज संचालन हर्षद साळवी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धाक्सुद मंडळ यांच्या सर्व पदाधिकार्यांनी अथक परिश्रम घेतले.