| पनवेल | प्रतिनिधी |
स्वस्त किराणा व घरगुती सामान पुरविण्याचे आमिष दाखवून विविध ठिकाणी फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीस पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे अनेक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येणार आहेत.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या सोसायटीत भाड्याने घर घेऊन राहणारे आरोपी पती-पत्नी नवीन धनाजी पांचाळ (52) व विद्या नवीन पांचाळ (45) यांनी तालुक्यातील हेदुटणे व पाले बुद्रुक येथील काही लोकांना स्वस्त दरात होलसेल किराणा सामान, कपडे व घरगुती वस्तू देण्याचे आमिष दाखवून प्रथम त्यांना काही सामान स्वस्तात पुरवला. त्यांचा विश्वास संपादन करुन तसेच त्यांना किराणा व घरगुती सामानाचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे आमिष दाखवून त्यांचयाकडून सामानासाठी मोठी रक्कम ऑनलाईन व रोखीने एकूण 5,05,285/- रक्कम स्वीकारुन किराणा सामान न पुरवता तसेच घेतलेले पैसेदेखील परत न देता मोबाईल फोन बंद करुन व घर सोडून निघून गेले. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करताच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 3, पनवेल प्रशांत मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंदा कांबळे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक अनुरुध्द गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा विजय देवरे, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा सतिष तांडेल, पोहवा शिवाजी बाबर, पोहवा भुषण म्हारसे, पोशि आकाश भगत, पोशि भिमराव खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे आरोपीना आळंदी, पुणे येथून अटक केली. या आरोपींची वेगवेगळे मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी, वेगवेगळे बँक खाते वापरुन तसेच वेगवेगळ्या पत्त्यांवर भाड्याने घर घेऊन नमूद गुन्ह्यातील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या आरोपींविरोधात वाठोडे पोलीस ठाणे, नागपूर शहर आणि कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असून, वाठोडे पो. ठाणे, नागपूर येथील गुन्ह्यात दोन्ही आरोपी फरार आहेत. यांच्या अटकेमुळे अजूनही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पांचाळ दाम्पत्याने लावला लाखोंचा चुना
