ग्रामपंचायतीत प्रशासकांची ‘पंचाईत’

माणगाव तालुक्यातील विकासाचा गावगाडा कोसळला


। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या मुदती गेली अनेक दिवस संपल्या आहेत. गावगाडा हाकणारा कारभारी नसल्याने गावच्या विकास कामांना खीळ बसत आहे. माणगाव तालुक्यात या सरपंच पदाच्या रिक्त जागेवर 6 प्रशासक अधिकारी नेमल्याने या प्रशासकांकडे आपल्या पंचायत समितीतील मूळ कामांबरोबरच 21 ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार सोपवल्यामुळे ग्रामपंचायतीत प्रशासकांची चांगलीच ‘पंचाईत’ झाली आहे. यामुळे गावच्या विकासाचे चक्रच निवडणुकीअभावी थांबले आहे.

माणगाव तालुक्यात 75 ग्रामपंचायती असून त्यापैकी तब्बल 21 ग्रामपंचायतीच्या माहे मार्च 2024 पूर्वी मुदती संपल्या आहेत. त्यामुळे माणगाव तालुक्यातील या ग्रामपंचायतीचा गावगाडा कोसळला असून गावचा विकास पर्यायाने खुंटत चालला आहे. ग्रामपंचायतीवर कारभारीच नसल्याने गावाच्या विविध विकासासाठी निधी कोण आणणार? असा सवाल ग्रामस्थांतून बोलताना व्यक्त होत आहे. या ग्रामपंचायतीवर शासनाने प्रशासक बसवले असले तरी, गावाच्या विविध विकासासाठी मंत्री, आमदार, खासदार तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडील गावाच्या विकासासाठी देण्यात येणारा निधीला आळा बसत आहे.

माणगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर शासनांनी प्रशासक म्हणून पंचायत समिती मधील संबंधित विविध अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या असून या ग्रामपंचायतीचा गावगाडा या प्रशासकामार्फत चालविला जात आहे. मात्र या प्रशासकांना लोकप्रतिनिधीकडील निधी आणण्यात मर्यादा पडतात. त्यामुळे गावच्या विकासाला गावगाड्याला खिळ बसत आहे.

माणगाव तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीचे अतिरिक्त कामाचे ओझे माणगाव पंचायत समितीतील विविध खात्यांच्या कर्मचार्‍यावर टाकले आहे. त्यामुळे एका प्रशासकाकडे आपल्या मूळ खात्याचा कारभार सांभाळून उर्वरित ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळावा लागतो. एका एका प्रशासकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायत सोपवल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीमधील पोटणेर, वावेदिवाळी, पाटणूस, साले, निजामपूर या पाच ग्रामपंचायतीवर आरोग्य विस्तार अधिकारी रत्नदिप आंबरे हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत, तर विळे, तळाशेत, मढेगांव, फलाणी या चार ग्रा. पं. वर कृषी विस्तार अधिकारी अशोक मारकड हे प्रशासक आहेत, वरचीवाडी, साळवे, पेण तर्फे तळे, सणसवाडी या चार ग्रा. पं. सांखिकी विस्तार अधिकारी मनिषा मुसळे हे प्रशासक आहेत. तळेगांव तर्फे गोरेगांव, सुरव तर्फे तळे, निळज या तीन ग्रा. पं. वर आरोग्य विस्तार अधिकारी सिमा काकडे ह्या प्रशासक म्हणून काम पाहतात. रवाळजे, साजे या दोन ग्रा. पं. वर कृषी विस्तार अधिकारी शिवदत्त परजणे हे प्रशासक म्हणून काम करत आहेत. पाणसई, दाखणे, कोस्तेखुर्द या तीन ग्रा. पं. वर सांखिकी विस्तार अधिकार मधूकर पी. फड हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. या 21 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केल्याने गावचा कारभार मंदावला आहे. निवडणूक आयोगांनी निवडणुका मुदतीत घेणे गरजेचे होते. या निवडणुका वेळीच घेतल्या असत्या तर गावचा विकास अधिक गतिमान होईल असा विश्‍वास नागरिकांना वाटत आहे.


Exit mobile version