ज्येष्ठ रंगकर्मी पांडुरंग घांग्रेकर यांचे निधन

। पेण । प्रतिनिधी ।
पेण येथील ज्येष्ठ रंगकर्मी पांडुरंग घांग्रेकर यांचे नुकतेच वृध्दापकाळाने दु.खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 86 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर विश्‍वेश्‍वर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंयात्रेला ललित कला मंडळाचे तसेच नाटय, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. भारतीय नाट्यपरिषदेत एक गुणी नाटयसेवक म्हणून पांडुरंग घांग्रेकर हे सर्वश्रृत व सर्वज्ञात होते. ग्रामीण भागात घांग्र्रेकर संगीत शिबिरे आयोजित करून भक्ती दिंडी स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करून लोकांमध्ये सांस्कृतिक स्फुल्लिंग चेतविण्याचा सतत प्रयत्न करत होते.


वास्तविक घांग्रेकर हे अतिशय कसलेले कलावंत, दिग्दर्शक आणि लेखक होते. आतापर्यत त्यांनी पाटलांची औलाद, स्वर्गहरण, बदला, रामजानकी, पुत्रवती आदी नाटकांमधून आपली प्रतिमा सिध्द केली होतीे. मुलांसाठी हुतात्मा, विघ्नहर्ता, जंमत जगावेगळी अशी बारा नाटके लिहून बालनाट्यकार हा बहुमान पटकावला होता ते नुसते नाटके लिहित नव्हते तर ती लिहून स्वतःदिग्दर्शक करून रंगभूमीवर सादर करीत होते त्यांच्या कारकीर्दीतील वंदे मातरम् महानाटयाचे 51 प्रयोग महाराष्ट्रभर केले होते या नाटकामध्ये 450 ते 500 विदयार्थ्यांना एकत्र घेउन एक मोठा विक्रम केला होता. त्यांची नाटयसेवा पाहूनच त्यांना अ.भा.नाटयपरिषदेवर सदस्य म्हणून घेण्यात आले होते.

प्रथितयंश कंपनीच्या गाजलेल्या नाटकात भूमिका केल्यामुळे त्यांना दामू अण्णा मालवणकर, ज्योत्स्ना भोळे, प्रभाकर पणशीकर, मा.अविनाश, वसंत शिंदे, चित्तरंजन कोल्हटकर, सूर्यकांत मांढरे, हंसा वाडकर, वत्सला देशमुख, नयनतारा, रविराज, मंदा देसाई, सखाराम भावे, केशवराव मोरे, बाळ धुरी, कृष्णकांत दळवी, मोहन कोठीवान, संजिवनी बिडकर, बबन चव्हाण यांच्यासारख्या आणखी कितीतरी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंतासह श्री. घांग्रेकर यांनी नाटकांतून वेगवेगळया भूमिका करून आपल्या अभिनयाचे पैलू दाखवले. पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरच्या दिवार, पठाण या हिंदी नाट्यातून शशी कपूर यांच्याबरोबर घांग्रेकरांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा कुटुंब परिवार आहे. पांडुरंग घांग्रेकरांच्या ज्यानेने पेणकरांची मोठी सांस्कृतिक हानी झाल्याची प्रतिक्रिया पेणकर व्यक्त करत आहेत.

Exit mobile version