| अलिबाग | विशेष प्रतिनिधी|
उरण- नेरुळ मार्गावरील जासई- चिलें- एकटघर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलावरील ३० मीटर लांबीचा इनबिल्ट गर्डर नऊ फूट उंचीवरून कोसळला आहे. पुलावर ठेवण्याचे काम सुरू असताना हा गर्डर घसरला आहे. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती ठाणे क्रीक ब्रीज विभागाच्या उपअभियंता श्रद्धा शेळके यांनी दिली.
उरण पनवेल मार्गाला जोडून असलेल्या दास्तान फाटा ते चिलें असा एमआयडीसीचा मार्ग आहे. या मार्गावर उरण-बेलापूर ही प्रवासी रेल्वे सुरू होणार आहे. या मार्गावर असलेल्या जुन्या रेल्वे फाटकाचा भविष्यात रेल्वे वाहतुकीसाठी नागरिकांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी या मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मागील वर्षांपासून सुरू असलेल्या या उड्डाणपुलाचे काम ठाणे क्रिक ब्रीज विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या उड्डाणपुलावर सोमवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास इनबिल्ट तयार गर्डर जोडण्याचे काम सुरू होते. मात्र अचानक ३० मीटर लांबीचा आणि सुमारे १५ मीटर रुंदीचा हा गर्डर सुमारे नऊ फूट उंचीवरून खाली कोसळला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
नऊ फुटी उंचीवरून अलगद पडलेला गर्डर सुस्थितीत आहे. त्याला कुठेही तडा गेलेला नाही. तरीही त्याची तज्ज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी करून पुन्हा बसविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे क्रिक ब्रीज विभागाच्या उपअभियंता श्रद्धा शेळके यांनी दिली.