पर्यायी रस्त्यासाठी माथेरानकर आग्रही
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटनस्थळी येण्यासाठी पनवेल तालुक्यातील धोधानी भागातून रस्ता बनविला जाणार होता. त्या रस्त्याची नोंद राज्य सरकारच्या रस्ते विकास आराखड्यात होती. मात्र, वनजमिनीतून रस्ता करण्यात अडचणी येत असल्याने शेवटी रस्ते विकास आराखड्यातून हा रस्ता वगळण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यातून माथेरान येथे येण्यासाठी धोधानी गावाच्या हद्दीतून पायवाट रस्ता आहे. या रस्त्याने आजही अनेक आदिवासी लोक कामाच्या निमित्ताने माथेरान असा दररोज प्रवास करतात. त्या भागातून येणार्या रस्ता 1980 मध्ये राज्य सरकारच्या रस्ते विकास आराखड्यात समाविष्ट होता. मात्र, हा रस्ता वनजमिनीमधून जात असल्याने आणि वनजमीन रस्त्यासाठी मिळत नसल्याने हा रस्ता प्रलंबित राहिला. नंतर राज्य सरकारने आपल्या रस्ते विकास कार्यक्रमामधून धोधानी-पनवेल रस्त्याचे नाव काढून टाकले आहे. सुमारे 53.37 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकात पनवेल ते धोधानीदरम्यान टप्प्या-टप्प्याने डांबरीकरणाचे काम झाले. मात्र, धोधानी ते माथेरान हे सुमारे 7-8 किमी जंगलातून जाणारे आव्हानात्मक अंतर कोणत्याही ठेकेदाराने स्वीकारले नाही आणि त्यामुळे हा टप्पा पूर्ण होऊ शकला नाही.
त्यामुळे त्या ठिकाणी फ्यूनिकुलार रेल्वेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. 2011 पासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे. धोधानी गावात पार्किंगसाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. मुंबई-पुण्याहून येणार्या वाहनांना तिथे थांबवून, साधारण 700-800 मीटरचा रेल्वे ट्रॅक 20-40 अंशाच्या उतारावर बांधला जाईल. एक गाडी वरून खाली आणि एक खालून वर जाईल, अशा प्रकारचा हा सुरक्षित वाहतूक व्यवस्था होऊ शकतो. धोधानी ते माथेरान फिनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव समोर आला आणि त्यानंतर एमएमआरडीएने राईट्स या संस्थेमार्फत सविस्तर पाहणी करून प्रकल्प शक्य असल्याचे सांगितले. त्यानंतर 100 कोटी रुपयांचे ग्लोबल टेंडरही काढण्यात आले. मात्र, काही राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला. कारण देण्यात आले की, माथेरानला रोपवे प्रकल्प होणार आहे आणि त्यामुळे फिनिक्युलर प्रकल्प स्थगित करण्यात आला. वाहतूक व्यवस्थेत पर्याय म्हणून पनवेल भागातून पर्यायी रस्ता बनविला जावा यासाठी शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.