22 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावित कामांना मंजुरी
| पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने मागील अनेक वर्षांपासून ही वसाहत उद्योग क्षेत्रापासून दुर्लक्षित राहिली. अक्षरश: वनवासासारख्या वाईट अवस्थेमध्ये येथील 92 उद्योग टिकून राहिले. मागील तीन वर्षांपासून येथील उद्योजकांच्या संघटनेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यातील इतर सहकारी औद्योगिक वसाहतींच्या पायाभूत सुविधा पुरविण्याचे एमआयडीसीने निश्चित केले. पनवेल औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते डांबरीकरण, पाण्यासाठी जलकुंभ, मलनिस्सारणासाठी उदंचन केंद्र आणि पावसाळी गटार यांसारख्या प्रस्तावित कामांना लागणारा 22 कोटी 31 लाख रुपयांचा निधीला एमआयडीसीने मंजुरी दिली आहे.
1963 साली पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट या नावाने पनवेलची औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली असली, तरी 1968 सालापासून येथील 32 एकर जागेवर उद्योग स्थापन झाले. या औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष विजय लोखंडे व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या एमआयडीसीतील उच्चपदस्थ अधिकार्यांना औद्योगिक विभागाची खरी व्यथा समजल्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली.
औद्योगिक वसाहतीमध्ये केली जाणारी कामे डांबरीकरण 12 मीटर रुंदीचे 920 मीटर लांबीचे रस्ते 9 मीटर रुंदीचे 1512.29 मीटर लांबीचे रस्ते 6 मीटर रुंदीचे 82.67 मीटर लांबीचे रस्ते एकूण 2520 मीटर लांबीचे रस्ते पावसाळी गटारे 2520 मीटर लांबीच्या रस्त्यालगत दुहेरी बाजूस 5040 मीटर अंतरावर एक मीटर लांबीचे गटार मलनिस्सारण 2520 मीटर लांबीच्या रस्त्यालगतहून 250 मिलिमीटर व्यासाची मलनिस्सारण वाहिनी पाणीपुरवठा 100 मि.मी. व्यासाची जलवाहिनी 2620 मीटर लांबीची रस्त्यालगत. 2 लाख लिटर पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ, भूमिगत टाकीचे नियोजन
मागील अनेक वर्षांपासून आहे त्याच परिस्थितीमध्ये आमचे उद्योग टिकले आहेत. शासनाकडे तीन वर्षांपासून पनवेल औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करीत होतो. एमआयडीसीच्या अधिकार्यांनी त्यासाठी सहकार्य केले. लवकरच ही कामे सुरू होतील अशी अपेक्षा आहे.
विजय लोखंडे, अध्यक्ष, पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट