परवानगीशिवाय नवी मुंबई पालिकेच्या कंत्राटदाराने वृक्षतोड केल्याचा आरोप
। पनवेल ग्रामीण । विशेष प्रतिनिधी ।
जलवाहिनी टाकण्याच्या कामात अवैध्यरित्या वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप करत नवी मुंबई पालिकेच्या कंत्राटदार कंपनी विरोधात पनवेल पालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाकडून करण्यात आला आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शेकाप नेते अजित अडसूळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर पालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाने केलेल्या तक्रारीची दखल घेत नवी मुंबई पालिकेकडून जलवाहिनी टाकण्याच्या कामाकरिता नेमण्यात आलेल्या कंत्राटदार कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील मोरबे धरणातून नवी मुंबई पालिका हद्दीतील वसाहतीमध्ये पाणी पुरवठा केला जातो. यासाठी वापरण्यात येणार्या जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्याने गळती लागलेल्या या वाहिन्या बदलण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामासाठी नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून ठाणे येथील एसएमसी इन्स्ट्राक्चर कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेच्या मालकीच्या मोरबे येथील धरणातून टाकण्यात आलेली जलवाहिनी पनवेल पालिका हद्दीतून जात असल्याने पालिका हद्दीतील खारघर ते कोपरा या सायन-पनवेल महमार्गावरील परिसरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम करत असताना अडथळा ठरणारे वृक्ष तोडणे जरुरीचे होते.
पनवेल पालिका हद्दीतील हे वृक्ष तोडण्यापूर्वी पनवेल पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून परवानगी घेणे अपेक्षित होते. मात्र असे न करता कंत्राटदार कंपनीच्या कर्मचार्यांनी वृक्ष तोड केल्याचे निदर्शनास आल्याने पनवेल पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने लिपिक विवेक जळे यांनी खारघर पोलीस ठाण्यात एसएमसी इन्स्ट्राक्चर कंपनीचे अनिल मेश्राम तसेच धीरज पाटील यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या विषयी काही माहिती नसल्याने यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही असे उत्तर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले असून, अधिक माहिती घेण्यासाठी उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्याशी सपंर्क साधण्याची सूचना आयुक्त चितळे यांनी केली.
अधिकार्यांची उडवाउडवी
उपायुक्त राजळे यांनी दिलेल्या उत्तरानंतर वृक्षप्राधिकरण विभागाचे प्रमुख संदीप पवार यांच्याशी संपर्क साधला असता आपण देखील सुट्टीवर असल्याचे सांगत तक्रारदार लिपिक जळे यांच्याशी संपर्क साधण्याची सूचना पवार यांनी केली. मात्र अधिक माहिती देण्यासाठी जळे उपलब्ध होऊ शकले नाहीत.
सध्या सुट्टीवर असून अधिक माहिती वृक्षप्राधिकरण विभागाचे अधिकारी संदीप पवार देऊ शकतील.
बाबासाहेब राजळे,
उपायुक्त, पनवेल पालिका