रेल्वे स्टेशन परिसरात रस्त्यांवर वाहनतळ
| पनवेल | प्रतिनिधी |
नियोजनबद्ध वसवलेल्या नवीन पनवेल शहरात दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे. शहरात सर्वत्र दुतर्फा पार्किंग पाहायला मिळत असून, यामुळे विविध विभागांत वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. विशेष म्हणजे ‘नो पार्किंग’च्या फलकाला अजिबात न जुमानता तेथेच वाहने उभी केली जात आहेत. शहरभर नो पार्किंग फलक नुसते नावापुरते उरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या समस्येकडे नवीन पनवेल वाहतूक पोलीस व पालिकेचेही दुर्लक्ष होत आहे.
नवीन पनवेल शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच नवीन पनवेल रेल्वेस्थानक परिसरातील अंतर्गत गल्ल्या अरुंद रस्त्यांवर बेकायदेशीर दुचाकी वाहने पार्क केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, पालिकेच्या सफाई कर्मचार्यांना दररोज रस्तेसुद्धा साफ करता येत नसल्याने शहरात अस्वस्छता दिसत असते. नवीन पनवेलच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा कामधंद्यानिमित्ताने मुंबईकडे ये-जा करीत असल्यामुळे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी आपल्या दुचाकी रेल्वे परिसरातच पार्क करून ठेवत आहेत. त्यामुळे या परिसरातून ये-जा करताना प्रवाशांना व पादचार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
असे असताना रेल्वे प्रशासन व महापालिका प्रशासन यावर कोणतीही उपाययोजना करत नाहीत. येथील रहिवासी वारंवार वरिष्ठ वाहतूक पोलीसांकडे तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. कधीतरी थातूरमातूर कारवाई होते. रेल्वे स्टेशन परिसरातील सोसायटीच्या गेटसमोर नागरिक दुचाकी, चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे पार्क केल्यामुळे सोसायटीच्या नागरिकांना सोसायटीतील वाहने आत-बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागत असते. काही दुचाकी फूटपाथवर पार्क केल्या जातात. तसेच बेकायदेशीर रिक्षा चालक रस्त्यावर रिक्षा उभ्या करत असल्यामुळे पादचार्यांना चालण्यासाठी जागा ही मिळत नसल्याने या परिसरात दररोज वादविवाद घटना वाढत आहेत. तसेच महावितरणने खोदलेले रस्ते यामुळे वाहतूक कोंडीने येथील रहिवासी त्रस्त झाले असून, अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच येथे पार्क केलेल्या वाहनांच्या सुरक्षिततेची कोणतीच हमी नसताना येथे वाहने पार्क केली जातात. तरी महापालिकेने रेल्वे प्रशासनाने वाहनांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेच्या जागेत मोकळ्या भूखंडावर वाहनतळ उभारावे, तसेच सार्वजनिक बससेवा मोठ्या प्रमाणात सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी व स्थानिकांकडून होत आहे.