। अलिबाग । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन ते माणगावपर्यंतचा रस्ता चकाचक झाला आहे. परंतु, या मार्गावरील अनेक गावांतील नागरिकांना एसटी बसची सुविधा पुरेसी मिळत नसल्याने ज्यादा पैसे भरून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. एसटी बसची पुरेशी सुविधा नसल्याने साई ते माणगाव मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. एसटी बससाठी त्यांना तासन्तास रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
दक्षिण रायगडमधील अनेक गावांमध्ये जाणारे रस्ते डांबरी व सिमेट काँक्रिटचे बनविण्यात आले आहेत. रस्ते चकाचक झाल्याने या मार्गावरील प्रवासही सुखकर होऊ लागला आहे. माणगाव-श्रीवर्धन या दोन तालुक्यांना जोडणार्या रस्त्यामुळे दुचाकीसह अनेक वाहनांची वर्दळ या मार्गावर आहे. शाळा, कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांसह या दोन तालुक्यांत दैनंदिन कामानिमित्त येणार्या-जाणार्यांची संख्यादेखील प्रचंड आहे.
माणगाव व श्रीवर्धन आगारातून एसटी बसेसदेखील या मार्गावरून धावत आहेत. परंतु, एसटी बसची पुरेसी सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तासन्तास रस्त्याच्या बाजूला एसटीची वाट पाहावी लागत आहे. गोरेगाव परिसरातील उणेगावासह काही गावांतील रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. परंतु, त्या गावांमध्यदेखील एसटी बस पोहोचत नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘जेथे रस्ता, तेथे एसटी’ ही एसटीची संकल्पना आता फोल ठरू लागली आहे. श्रीवर्धन ते माणगाव मार्गावरील साई ते माणगाव येथील अनेक गावांतील प्रवाशांना एसटी बस थांबत नाही. मोजक्याच बसेस असल्याने प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेवर पोहोचता येत नाही. एसटी बस नसल्याने अनेक प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. एसटी महामंडळ विभागाने याकडे गांभीर्याने विचार करून ज्यादा एसटी बसेसची सुविधा करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
माणगाव – श्रीवर्धन मार्गावरील प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी दोन्हीआगारातील आगार व्यवस्थापकांसोबत चर्चा करून ज्यादा बसेस रस्त्यावर पाठविण्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न राहिल.
दिपक घोडे
– विभाग नियंत्रक,
एसटी महामंडळ रायगड विभाग