| उरण | वार्ताहर |
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला न भूतो न भविष्यति असं यश मिळालं, पण त्यानंतर खातेवाटपापासून ते पालकमंत्रीपदापर्यंत प्रत्येकवेळी तिढा निर्माण झाला. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नाही, याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद चव्हाट्यावर अनेकदा आला आहे. आधी खातेवाटपाचे गुर्हाळ चालले, त्यानंतर आता पालकमंत्रीपदाचा तिढा निर्माण झाला आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून घोडं अडलंय. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये चर्चा अन् रस्सीखेच सुरू आहे. भाजप नाशिकच्या पालकमंत्रिपदावर ठाम आहे, तर अजितदादा रायगड सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून तोडगा लवकर निघेल असं सांगण्यात येतेय, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत यावर ठोस निर्णय होईल, असे दिसत नाही.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना भिडण्याची पहिली वेळ नाही. याआधीही महायुतीच्या सरकारमध्ये तटकरे आणि गोगावले रायगडवरून आमनेसामने आले होते. आता गोगावले यांना मंत्रिपद मिळाले, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावर त्यांना दावा ठोकला आहे. तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राने पाहिलाय. आदिती तटकरे यांची पालकमंत्रिपदी वर्णी लागताच गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय गोगावले समर्थकांनी आंदोलने केली होती. रायगडचे पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. त्यात सुनील तटकरे रायगड सोडण्यास तयार नाहीत. रायगडवर अजितदादा आणि एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात? याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.