दोन महिन्यांपासून मानधनापासून वंचित
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका गेली दोन महिने मानधनाविना काम करीत आहेत. परिचारिकांचे मानधन थकल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. महिन्याचा ताळमेळ जुळविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी अलिबागमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले. तसेच रोहा, पेण, खालापूर, महाड, माणगाव, श्रीवर्धन अशा अनेक तालुक्यांमध्ये उपजिल्हा रुणालयासह ग्रामीण रुग्णालये उभारण्यात आली आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी कंत्राटी परिचारिकांची नेमणूक करण्यात आली. जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत त्यांची सहा ते अकरा महिन्यांच्या करारावर नियुक्ती करण्यात आली आहे.
दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, परिचारिकांना गेल्या दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे. परिचारिकांना मानधन मिळत नसल्याने घरखर्चाचा ताळमेळ जुळविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्ज व महिन्यातील इतर खर्चाचे आर्थिक नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांचा आर्थिक ताळमेळ बिघडू लागला आहे.
गेल्या वर्षभरापासून हा प्रश्न कायमच भेडसावत आला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्याचे फक्त आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचे चित्र यातून स्पष्ट होत आहे. नव्याने जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून अतिरिक्त पदभार घेतलेले डॉ. निशीकांत पाटील ही समस्या सोडविणयास यशस्वी ठरतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
40 लाखांच्या निधीची प्रतीक्षा
दोन महिन्यांचे मानधन थकले आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडे 40 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. या निधीची प्रतीक्षा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनाला लागून राहिली आहे. हा निधी शासन कधी पाठविणार याकडे परिचारिकांचे लक्ष लागून राहिले आहे.