विद्यार्थ्यांच्या पाककला स्पर्धेचे आयोजन
। माणगाव । वार्ताहर ।
निसर्गातील विविध अनुभव देवून व्यक्तिमत्व विकसित करणार्या माध्यमिक विद्यामंदिर रातवडच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. 31) वनभोजनाचा आनंद घेतला.
शालेय परिसरातील वनात एक दिवस स्वतः जेवण बनवून आपल्या वर्गासहित सर्व शाळेने एकत्रित भोजनाचा आनंद घेतला. निसर्ग संपन्न आनंद देणार्या माध्यमिक विद्यालय रातवडचे विद्यार्थी शालेय परिसरातील वनात पूर्ण दिवसभर रमले. सकाळपासून गर्द झाडीत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे भोजन बनविण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी वनभोजनाची स्वतः तयारी केली होती. विविध प्रकारचा भाजीपाला, धान्य व इतर साहित्य स्वतः विद्यार्थ्यानी बाजारातून खरेदी केले. विविध प्रकारच्या रेसिपी यूट्यूब व पालकांकडून विचारून व समजावून घेतल्या व वनभोजनात विविध प्रकारच्या पाककृती बनविल्या. सकाळपासून विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव घेतला. स्वयंपाकातील विविध प्रकारच्या कामांचा अनुभव व आनंद घेतला. भोजन तयार झाल्यानंतर वर्गवार बनविलेल्या भोजनाचे परीक्षण करण्यात आले. परिक्षणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे भोजन मंत्र म्हणून भोजनाचा आनंद घेतला. भोजनानंतर स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करून परिसराची स्वच्छता केली.आनंदात एक दिवस निसर्गात वनभोजनाचा अनुभव सर्व शाळेने मनमुराद घेतला. या अनुभवातून विद्यार्थ्यांना निसर्गाची माहिती झाली. स्वतः हाताने भोजन करण्याचा अनुभव मिळाला व एकत्रितपणे भोजनाचा आनंद झाला. ज्ञानरचनावाद व प्रत्यक्ष अनुभूतीतून शिक्षण देण्याच्या विद्यालयाच्या या उपक्रमात विद्यालयातील मुख्याध्यापक संतोष कदम सर्व शिक्षकवृंद व पालकांचे नियोजन व सहकार्य लाभले.
सहल विभाग प्रमुख राजेंद्र भगत व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी वनभोजनाचे अत्यंत उत्तम नियोजन केले या वनभोजनात बनविण्यात आलेल्या पदार्थांचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक, इयत्ता सातवी द्वितीय क्रमांक व इयत्ता नववी वर्गाने तृतीय क्रमांक पटकाविला. रेसिपी विजेत्या वर्गांचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी अभिनंदन केले.