महामंडळाच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हयातील अलिबागसह पेण, महाड या आगारात सीएनजी पंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, सीएनजी गॅस भरण्यासाठी आगारातच विलंब होत आहे. त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. गॅस भरण्यासाठी विलंब होत असल्याने प्रवाशांना भर उन्हात एसटीची वाट पहावी लागत असल्याचा महाड एसटी बस आगारातील प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात सीएनजीवर चालणार्या एसटी बसवर भर देण्यात आला आहे. अलिबाग, पेण, महाड या एसटी बस आगारात सीएनजी गॅस पंप उभारण्यात आले आहे. जिल्हयात सीएनजीवर चालणार्या सुमारे 260 एसटी बसेस आहेत. डिझेलची जागा आता सीएनजीने घेतली आहे. अलिबाग, पेण, व महाड या एसटी बस आगारात सीएनजी गॅस पंप उभारण्यात आले आहे. या आगारांमध्ये सीएनजीवर चालणार्या बस आहेत. मात्र, गॅस भरण्यासाठी विलंब होत असल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
महाड एसटी बस आगारातील सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी एसटी बसच्या रांगा दिसून आल्या.बसमध्ये गॅस भरण्यासाठी विलंब होत असल्याने तेथील प्रवाशांना उन्हात उभे राहून एसटीची वाट पहावी लागत आहे. सध्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. उन्हाचे चटके बसत आहेत. बसची वाट पाहण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाशांना उष्माघाताचा धोका निर्माण होत असताना त्याकडे मात्र एसटी महामंडळाचे दूर्लक्ष असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न यातून निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सीएनजी गॅस भरण्यासाठी बस थांबतात. मात्र, निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हातच उभे राहून बसची वाट पहावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.