जबाबदार डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचाराअभावी मृत्यू झालेल्या म्हसळा तालुक्यातील घुम गावातील गर्वांग गायकर याला न्याय मिळवून देणार, अशी ग्वाही शेकाप रायगड जिल्हा आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिली. गर्वांग गायकर कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन गर्वांगच्या मृत्यूस जबाबदार असणार्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
म्हसळा तालुक्यात घुम गावातील सातवीमध्ये शिकणार्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी उघडकीस आली. गर्वांगच्या मृत्यूने घूम गावासाठी संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून, या मृत्यूला माणगाव रुग्णालयातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप त्याचा कुटुंबियांनी केले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील, श्रीवर्धन तालुका चिटणीस विश्वास तोडणकर व इतर कार्यकर्ते यांनी गायकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन झालेल्या घटनेची माहिती घेतली.
गर्वांग आजारी झाल्यामुळे त्याला म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लाऊन त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी विनाउपचार करता त्याला घरी पाठवले, मात्र गर्वांग घरी पोहोचताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांनी गर्वांगला उपचारासाठी ठेवले असते, तर त्यांच्या कुटुंबियांवर अशी दु:खाची वेळ आली नसती.
श्रीवर्धन, म्हसळा हे तालुके निसर्गसंपन्न आहेत. मात्र, येथील आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे. तालुक्यातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. यातून रायगड जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेल्या दोन्ही घटनेच्या बाबतीत जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत.
चित्रलेखा पाटील,
रायगड जिल्हा शेकाप महिला आघाडी प्रमुख