रायगडचे पासपोर्ट कार्यालय अखेर सुरु

रचना म्हात्रे यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करून उद्घा‌टन

| रायगड | प्रतिनिधी |

रायगडकरांना पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे येथे जावे लागण्याचा खर्च आणि वेळ आता वाचणार आहे. पासपोर्ट कार्यालय रायगड जिल्ह्यात असावे, अशी मागणी जोर धरीत होती. ही रायगडकरांची मागणी पूर्णत्वास आली आहे. शनिवारी (दि.05) अलिबाग येथे जिल्हा पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले. यामुळे रायगडकरांची पासपोर्ट केंद्राची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पासपोर्ट कार्यालय उद्घाटन प्रसंगी चेंढरे येथील रचना अरुण म्हात्रे (67) यांच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यात आले. यावेळी खा.सुनील तटकरे , जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रादेक्षिक पासपोर्ट अधिकारी डॉ राजेंद्र गावंदे, पोस्ट अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी खा.सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणातून ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचे विशेष आभार व्यक्त केले. पासपोर्ट कार्यालय अलिबागमध्ये सुरु व्हावे यासाठी वालेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे मी पण प्रयत्नशील राहिलो, असे ते म्हणाले.

अलिबाग येथे सुरू झालेल्या पासपोर्ट केंद्रामुळे रायगडकरांची मागणी पूर्ण झाली आहे. पासपोर्ट कार्यालय, पोलीस यांनी परस्परांच्या सहकार्यातून काम करून नागरिकांना लवकरात लवकर पासपोर्ट संबंधी प्रक्रिया कशी पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे. या कार्यालयातून पहिला नूतन पासपोर्ट 15 ऑगस्ट रोजी पासपोर्ट धारकास मिळावा.

खा. सुनील तटकरे

रायगड जिल्ह्यात दिवसाला 80 पासपोर्टसाठीचे अर्ज वाटले जाणार आहे. अलिबाग पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट कार्यालयात सुरुवातीला 40 पासपोर्टच्या अर्जाचे काम केले जाणार आहे. रायगड पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट संबंधीच्या नागरिकांच्या काही सूचना, तक्रारी असल्यास बांद्रा येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा.

डॉ. राजेंद्र गवांदे, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी
Exit mobile version