| खोपोली | वार्ताहर |
रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या वतीने सुरु करण्यात आलेले रुग्ण साहित्य सेवा केंद्र हे वावोशी छत्तिशी परिसरातील ग्रामस्थांना निश्चितच आधार बनेल, असे उद्गार रायगड भूषण रामदास महाराज पाटील यांनी वावोशी फाटा येथे बोलताना काढले.
जनकल्याण समितीच्या वतीने वावोशी फाटा येथील जनार्दन हाडप यांच्या कृषी सेवा केंद्रामध्ये सुरू करण्यात आलेल्या रुग्ण साहित्य सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी रामदास महाराज बोलत होते. याप्रसंगी रा.स्व.संघाचे तालुका कार्यवाह अविनाश मोरे,ज्येष्ठ संघ कार्यकर्ते जयंत(मामा) टिळक ,जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे, प्रकल्प प्रमुख जनार्दन हाडप व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नितीन भावे यांनी जनकल्याण समितीचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून समितीच्या वतीने सोळाशे हून अधिक सेवाकार्य सुरू असल्याचे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. मामा टिळक यांनी रुग्ण साहित्य केंद्रामुळे परिसरातील जनतेची मोठी सोय होणार असल्याचे सांगितले. शेवटी जनार्दन हाडप यांनी आभार मानले. भगवान शेटे गुरुजी, दाबके यांच्यासह ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.