लहरी हवामानातही पेरभात बहरले

कोषाणेतील शेतकर्‍याची अडचणींवर मात; मजूर आणि वेळेचीही झाली बचत

| नेरळ | वार्ताहर |

भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आणि पावसाने दडी मारली, त्यामुळे भात रोपे हवी तशी तयार झाली नाहीत. तरीही खचून न जाता एका प्रगतशील शेतकर्‍याने भात बियाणे पेरभात पद्धतीने पेरणी करून भातपीक घेण्याचा निर्णय घेतला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. यामुळे मुख्य म्हणजे, मजुरांची भेडसावणारी समस्या सुटली आणि वेळ व मेहनतसुद्धा वाचली.

यंदा चांगला पाऊस होणार असल्याने शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या. वेळेवर पाऊस सुरु होणार या अंदाजाने बळीराजाने उत्साहात पेरण्या केल्या. काहींनी एसआरटी पद्धतीने पेरण्या केल्या होत्या. कारण, गेल्या वर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे एसआरटी पद्धतीच्या पेरण्या उपयुक्त ठरल्या होत्या. मात्र, पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकर्‍यांवर पुन्हा पेरण्या करण्याची वेळ आली; परंतु वेळ निघून गेली होती. भातपीक हाती येईल काय? अशी शंका होती.

या सर्वावर मात केली ती शेतीमध्ये विविध प्रयोग करणार्‍या कोषाणे गावातील प्रगतशील शेतकरी हरिश्‍चंद्र तातू ठोंबरे यांनी. त्यावर एक कल्पना लढवून भात बियाणे पेरभात पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. आपल्या भरत या मुलाला व एका माणसाला बरोबर घेऊन त्यांनी चार एकर जमीन केवळ दोन तासात पेरभात पद्धतीने पेरली. जोमदार भात रोपे सहा-सात दिवसातच बाहेर आली आणि आता ती शेते हिरवीगार जोमाने डौलत आहेत.

अशी केली पेरणी
ठोंबरे यांनी एक एकर शेतीसाठी 25 किलो भात बियाणे वापरले. जमिनीला थोडा ओलावा आल्यावर पूर्ण शेतात साधी नांगरणी केली. गवत उगवू नये म्हणून भात बियाण्यात साथी नावाची तणनाशक पावडर मिसळली. त्यानंतर बियाणे पेरले व पुन्हा हलकी नांगरणी केली. त्यामुळे बियाणे मातीत मिसळले गेले. त्यानंतर भात रोपांमध्ये थोडे अनावश्यक गवत उगवले. त्यावर उपाय म्हणून त्यांनी युरिया खतामध्येसुद्धा साथी तणनाशक पावडर मिसळून खत मारले, त्यामुळे भातपीक हिरवेगार झाले व अनावश्यक गवत नष्ट झाले. कसई नावाचे गवत आल्यास क्लिचंर नावाचे तणनाशक मारावे, असे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत. या प्रयोगाने त्यांची शेती दृष्ट लागण्यासारखी झाली आहे.

गेल्या वर्षी पावसामुळे वाहून गेलेल्या भात रोपानंतरही मी हा प्रयोग केला होता. त्यावेळी मात्र भात भिजवून मोड आलेले भात बियाणे पेरले होते. ते पक्ष्यांनी खाऊ नये म्हणून बियाण्यामध्ये फॉरेट पावडर मिसळून पेरले होते. त्यामुळे पक्षी, पाखरे किंवा खेकडेसुद्धा फिरकले नाहीत. त्यामुळे पीक सुरक्षित राहिले होते.

हरिश्‍चंद्र ठोंबरे, प्रगतशील शेतकरी
Exit mobile version