। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
एलइडी व पर्ससीन मच्छिमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी विशेष कायदा करण्यात आला; परंतु त्याची कठोर कार्यवाही व अंमलबजावणी होत नसल्याने स्थानिक मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासन या बाबीकडे गांभीर्याने पाहात नसल्याने एलईडी व पर्ससीन मच्छिमारी करणार्यांचे चांगलेच फावले असून, खोल समुद्रात अशा पद्धतीने मासेमारी करणार्यांचे चांगले दिवस आले आहेत.
एलइडी व पर्ससीन मच्छिमारी करणारा पकडला गेला तर प्रथम मत्स्य विभागाकडून त्याच्यावर कार्यवाही केल्यानंतर त्याला तहसीलदार यांच्यासमोर उभे केले जाते. तद्नंतर दंड भरल्यावर त्याला मोकळे केले जात असल्याने ही कार्यवाही जुजबी स्वरूपात होत असल्याने एलइडी व पर्ससीन मच्छिमारी करणार्यांचे चांगलेच फावले आहे. मत्स्य विभागाकडे खोल समुद्रात मासेमारी एलइडी व पर्ससीनद्वारे होत असेल, तर हा विभाग त्या होड्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण, मत्स्य विभागाला शासनाने सक्षम सुविधाच प्रदान करण्यात आलेल्या नाहीत.