भात पिकावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव

कृषी विभागाने उपाययोजना करण्याची मागणी

| कोर्लई | वार्ताहर |

मागील महिन्यापासून पावसाचा असलेला लहरीपणा अखेर भात पिकावरील खोडकिडा रोगाला पोषक ठरत असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका मुरुड तालुक्यातील बहुंताशी भागात भात पिकावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून या महिन्यात पिकाला पोषक असा पाऊस न पडल्यास उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमच्या प्रतिनिधीने तालुक्यातील मजगांव येथील शेतकरी जनार्दन काबूकर यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट दिली असता त्यांनी आपल्या शेतात पावसाअभावी खोडकिडा लागून कसे नुकसान झाले हे दाखवून माहिती दिली व शेतातील भात पिकाच्या रोपांच्या मुळाशी खोडकिडा लागून त्याचे पाखरा मध्ये रूपांतर होऊन ही पाखरे शेतात अधिक प्रमाणात पसरुन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. यासाठी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहाणी करून शेतकऱ्यांन योग्य ते मार्गदर्शन व उपाययोजना करावी तसेच खोडकिडा रोगावर नियंत्रणासाठी कामगंध सापळे उपलब्ध करून देण्याची मागणी जनार्दन काबूकर यांनी केली आहे.

भात पिकावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ क्विनॉलफॉस 2 मि.ली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 0.5 मि.ली.प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघडीप असताना फवारावे. तसेच कामगंध सापळे एकरी आठ या प्रमाणात लावावेत. इतर किडींच्या नियंत्रणासाठीही शेतकऱ्यांनी भात खाचरामधे पक्षी खांबे उभारावेत म्हणजे पक्ष्यांमार्फत किडींचा बंदोबस्त होईल.

मनीषा भुजबळ
तालुका कृषी अधिकारी, मुरुड-जंजिरा
Exit mobile version