हॉटेल व्यावसायिक, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान हे केवळ पर्यटनावर आधारित असलेले शहर आहे.त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय येथील जनतेचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. हे लक्षात घेऊन शासनाने गॅस सिलिंडरचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी माथेरानमधील हॉटेल व्यावसायिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.
माथेरान हे जागतिक दर्जाच पर्यटन स्थळ असून, माथेरानचे आर्थिक व्यवहार हे 100 टक्के पर्यटनावर अवलंबून असल्या कारणाने माथेरानचे पर्यटन हेच सर्वसामान्य माथेरानकरांचे उपजीविकेचे साधन असून, माथेरान मधील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक तसेच घरघुती लॉजधारक आणि येणाऱ्या पर्यटकांना सुविधा देणारे रेस्टॉरंटधारक आणि विविध पॉईंट तसेच इतर ठिकाणी असलेले छोटे स्टॉलधारक यांचा 100 टक्के व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून आहे. परंतु, कालपासून माथेरानमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा हा गॅस पुरवठादारांकडून पूर्णपणे बंद करण्यात आला असून, घरघुती गॅसचा पुरवठादेखील कमी करण्यात आला आहे.
दरम्यान, गॅस पुरवठा बंद करण्यात आला तर त्याचा विपरीत परिणाम इथल्या पर्यटनावर होणार असून, छोटी मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाबे, स्टॉल बंद करायला लागतील, त्यामुळे सर्वसामान्य माथेरानच्या नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड भोगावा लागून सर्व व्यवसाय ठप्प होऊन जातील. तरी माथेरानसाठी विशेष बाब म्हणून कमर्शिअल तसेच घरघुती गॅस सिलिंडरचा नियमित पुरवठा होणेकामी गॅसपुरवठा धारकाला नियमित गॅस पुरवठा करण्याबाबत आदेश द्यावेत तसेच आपल्या माध्यमातून सदरचा गहन प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाला शिफारस करण्याची मागणी माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि माथेरान नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार तसेच हॉटेल व्यावसायिक सचिन दाभेकर यांनी माथेरानचे महसूल अधीक्षक सुरेंद्र ठाकूर यांच्याकडे केली आहे.
