। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुंबई विद्यापीठ आणि जे.एस.एम. कॉलेज एन.एस.एस. युनिटच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकार्यांसाठी रायगड जिल्हास्तरीय नियोजन सत्र संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, सुशील शिंदे, रमेश देवकर, तुळशीदास मोकल, निखिल कारखानीस, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत तसेच रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील 80 एन.एस. एस. कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते. सुशील शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, राष्ट्रीय सेवा योजना ही एक प्राध्यापकांकारिता संधी आहे ज्यामध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत सामाजिक उपक्रम राबवून व्यक्तिमत्व विकास साधू शकतात.
अॅड. गौतम पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, एन. एस. एस. हे एक व्यक्तीमत्व विकासाचे व समाजसेवेचे उत्कृष्ट माध्यम आहे. तसेच त्यांनी आपण एन. एस. एस. स्वयंसेवक म्हणून काम करत असतानाचे अनुभव सांगितले. आपल्या मनोगताच्या शेवटी अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी नियोजन सत्रासाठी शुभेच्छा दिल्या व मुंबई विद्यापीठाने जे. एस. एम. कॉलेजला नियोजन सत्र आयोजित करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले. याप्रसंगी जे.एस. एम. महाविद्यालयाचे एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांची विभागीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. व त्यांना मुंबई विद्यापीठाचा रायगड जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई विद्यापीठाचे एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.