। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-पनवेल या नवीन मार्गावर किरवली येथे बोगदा बांधला जात आहे. या बोगद्याच्या कामामुळे तेथील रहिवाशांचे घरांचे तसेच पाण्याच्या विहिरीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, रेल्वे ठेकेदाराकडून स्थानिकावर अन्याय सुरू असून त्याविरुद्ध उपोषण करण्याचा इशारा आरपीआय आठवले गटाने दिला आहे.
पनवेल-कर्जत या रेल्वे मार्गावर नवीन मार्गिका टाकली जात आहे. त्यासाठी नव्याने बोगदा खोदला जात आहे.
किरवली गावाजवळ बनविण्यात येत असलेल्या बोगद्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. हा बोगदा बांधण्याच्या कामासाठी सातत्याने सुरुंग स्फोट केले जात असून त्यामुळे किरवली आणि हालीवली गावातील घरांचे नुकसान सुरू आहे. हे नुकसान होण्याचे सत्र गेली दोन वर्षे सुरू असून रेल्वेकडून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध स्थानिक पातळीवर अनेक निवेदने प्रशासनाला देण्यात आली. स्थानिक माजी सरपंच यांनी आतापर्यंत तीनवेळा उपोषणे केली असून अधिकारी वर्ग लेखी आश्वासन देऊनदेखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. त्यामुळे स्थानिक नुकसानग्रस्त ग्रामस्थ तसेच विहिरीचे पाणी गायब झाल्याने शेतकरी संतप्त आहेत.
या अन्यायाविरुद्ध आता आरपीआय आठवले गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आठवले गटाने जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन नुकसानग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्या नुकसानीबद्दल न्याय दिला नाही तर याच महिन्याच्या अखेरीस उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. आरपीआय आठवले गटाच्यावतीने हिरामण गायकवाड, जयेश शिंदे, किशोर गायकवाड, अलका सोनावणे, जिवक गायकवाड, विजय गायकवाड, अॅड. लक्ष्मण जाधव, निलेश गायकवाड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.