लोकसहभागातून बांधणार वनराई बंधारे

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

जिल्ह्यात एप्रिल-मेदरम्यान उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात लोकसहभागातून 6200 कच्चे व वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. सर्व तालुक्यात बंधारे बांधण्याचे नियोजन पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी सुदेश राणे यांनी दिली.

जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. अद्यापही जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाण्याचा प्रवाह प्रवाहित असल्याचे दिसून येत आहे. तसेच पावसाचे सावट कायम आहे. तरीही जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहेण. त्यानुसार यावर्षी 6200 बंधारे बांधले जाणार असून, प्रत्येक तालुक्यांना बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने कच्चे व वनराई बंधार्याचे उद्दिष्ट 74 टक्के पूर्ण केले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही तीव्र पाणीटंचाई जाणवलेली नाही. बंधारे बांधल्याचे फलित जिल्ह्यात दिसून आले. गतवर्षी पाणीटंचाईचा आराखडाही करावा लागला नाही. यावर्षी जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात 6200 वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

बंधारे बांधण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली असून, सर्व तालुक्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यानुसार काही तालुक्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. यावर्षी जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात 1000, कुडाळ तालुक्यात 1000, दोडामार्ग 400, वेंगुर्ला 500, मालवण 1000, देवगड 900, सावंतवाडी 1000, वैभववाडी 400 असे एकूण 6200 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. निश्‍चित केलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात नियोजन झाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक यांनी संभाव्य पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून जास्तीत जास्त बंधारे बांधण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी सुदेश राणे यांनी केले आहे.

Exit mobile version