तनिष्काने केली औषधी रोपांची लागवड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविणाऱ्या अलिबागमधील तनिष्का राकेश पाटील हीने तिचा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या उपक्रमातून साजरा केला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची गरज आहे. हे लक्षात घेऊन तिने घरासमोरच औषधी रोपांची लागवड करण्यावर भर दिला. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यातील वाघोडे येथील रहिवासी असणारी तनिष्का पाटील हीचा बुधवारी(दि.10) जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. तिने शेजारील मुला- मुलींना एकत्र केले. वडीलांच्या मदतीने घरासमोर लहान खड्डे तयार केले. या खड्डयात कडूलिंब या औषधी वनस्पतींच्या रोपांची लागवड केली.झाडे जगली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून तिने एक आगळ्या वेगळ्या उपक्रमातून वृक्षारोपण करण्यावर भर दिला. तनिष्काने आतापर्यंत 40 हून अधिक पदके कराटे क्रीडा क्षेत्रात मिळविली आहेत. राज्यस्तरिय खुल्या कराटे स्पर्धेत कास्य पदक, तालुकास्तरिय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन राज्यस्तरिय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळविला. राज्यस्तरिय स्पर्धेत कांस्य पदक, राष्ट्रीय स्पर्धेत मांस रेसलिंग क्रीडा प्रकारात कांस्य व बेल्ट रेसलिंग क्रिडा प्रकारात रौप्य पदक मिळवून यश संपादन केले. तनिष्काला महाराष्ट्र रत्न आणि राष्ट्रीय आदर्श क्रिडा रत्न पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे. प्रशिक्षक संतोष कवळे यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून ती कराटेचे धडे घेत आहे.





