‘नाट्यप्रभा’मधून रायगडच्या ग्रामीण कलावंतांसाठी हक्काचा रंगमंच: साहित्यिक ॲड. विलास नाईक
| अलिबाग | प्रतिनिधी |
मराठी रंगभूमीचा दीडशेहून अधिक वर्षांचा गौरवशाली इतिहास आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देत उभा आहे. विष्णूदास भावे यांच्या ‘सीतास्वयंवर’पासून सुरू झालेला हा रंगमंचाचा प्रवास अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत परंपरेतून, आचार्य अत्रे यांच्या गद्य नाटकांतून, विजय तेंडुलकर आणि कुसुमाग्रज यांच्या आधुनिक रंगभूमीतून आजच्या समकालीन नाट्यविश्वापर्यंत येऊन पोहोचला आहे. या समृद्ध परंपरेत रायगड जिल्ह्याने आपले वेगळे आणि मानाचे स्थान निर्माण केले आहे. याच समृद्ध नाट्यपरंपरेला नवी ऊर्जा देणारा आणि ग्रामीण भागातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा नाट्यप्रभा ग्रामीण नाट्यमहोत्सव सध्या अलिबागमध्ये रंगत आहे. पीएनपी कलाविकास मंडळ आयोजित चित्रलेखा नृपाल पाटील पुरस्कृत या नाट्यमहोत्सवाने ग्रामीण नाट्यचळवळीला नवसंजीवनी मिळाली आहे, असे मत साहित्यिक ॲड. विलास नाईक यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्ह्याच्या नाट्य संस्कृतीला शंभर वर्षांहून अधिक काळाची समृद्ध परंपरा लाभली आहे. विशेषतः चैत्र महिन्यात गावागावांत सादर होणारी नाटके ही रायगडच्या सांस्कृतिक जीवनाची ओळख मानली जाते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या नाट्यसंस्कृतीचा प्रभाव, तसेच मुंबईतील चाकरमान्यांची कलात्मक परंपरा यामुळे रायगडमधील ग्रामीण नाट्यविश्व अधिक समृद्ध झाले. या मातीतून अनेक कलाकार घडले आणि त्यांनी पुढे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
विजू खोटे, शुभा खोटे, जयंत सावरकर, नाना पाटेकर आणि सदाशिव अमरापूरकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचे रायगडशी घट्ट नाते राहिले आहे. त्याचबरोबर शाहीर साबळे यांनी मराठी संस्कृती आणि लोककलेला दिलेले योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते.
या नाट्यमहोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नाट्यकर्मी, निर्माते आणि कार्यकर्त्यांनी मोठी धावपळ केली असून, विक्रांत वार्डे, किशोर म्हात्रे, प्रकल्प वाणी, कार्याध्यक्ष प्रतीक पानकर यांच्यासह राजन पांचाळ, सागर नार्वेकर, केळुस्कर सर, संकल्प केळकर, दिनेश पाटील, जितेंद्र पाटील, अमोल मिठाग्री, नितेश पाटील, ऋषी पडवळ, अनिष मिठाग्री, दीपक काळेल, यश बनसोडे, अंश म्हात्रे, उपासना घोसाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा नाट्यमहोत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून, ग्रामीण कलावंतांसाठी एक मोठी संधी ठरत आहे. शहरांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या, पण अफाट प्रतिभा असलेल्या कलाकारांना यानिमित्ताने स्वतःची कला सादर करण्यासाठी हक्काचा रंगमंच उपलब्ध झाला आहे, असे ॲड. नाईक म्हणाले.
पीएनपी नाट्यगृहाचे योगदान महत्त्वाचे
अलिबागच्या सांस्कृतिक विश्वाला बळ देण्यात पीएनपी नाट्यगृहाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि सांस्कृतिक क्षेत्राला कायम प्रोत्साहन देणाऱ्या चित्रलेखा पाटील यांनी सातत्याने काम केले आहे, असेही ॲड. नाईक म्हणाले.
मराठी नाटकाचा समृद्ध इतिहास आणि रायगडची लोकपरंपरा यांचा सुंदर संगम या नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून अनुभवायला मिळत असून, हा उपक्रम रायगडच्या नाट्यचळवळीला निश्चितच नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरेल.
ॲड. विलास नाईक
