| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ग्रामीण रंगभूमी आयोजित आणि चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत नाट्यप्रभा या नाट्यमहोत्सवाची दमदार सुरुवात श्री हनुमान नाट्य मंडळ भोनंग निर्मित गजा आला रे या नाटकाने झाली. लेखक-दिग्दर्शक प्रकल्प वाणी यांनी तब्बल 18 वर्षांपूर्वी रायगडच्या रंगभूमीवर सादर केलेला हा प्रयोग पुन्हा नव्याने उभा करण्याचे धाडस भोनंगच्या ग्रामीण कलाकारांनी केले आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
गूढ, रहस्य, चमत्कार आणि विनोद यांच्या सुरेख मिश्रणाने सजलेले हे नाटक प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. मुंबईत राहणारा गजाननराव सरपोतदार विचित्र स्वप्नांनी त्रस्त झालेला असतो. त्याच्यासोबत विनोदाची किनार जपणारा मित्र संजू असतो. या स्वप्नांच्या मागचे रहस्य शोधताना गजा ङ्गङ्घबाबा चमत्कारफफपर्यंत पोहोचतो आणि तेथून कथानकाला खऱ्या अर्थाने रंग चढू लागतो.
श्रीरंगपूरच्या वाड्यात घडणाऱ्या घटना, गजाच्या स्वप्नात येणारे आत्मे आदिमानव, संत, बकुळा, मावळा हे पात्र प्रत्यक्ष रंगमंचावर अवतरतात आणि प्रेक्षकांना हसवून अक्षरशः सळो की पळो करून सोडतात. रंगराव आणि त्याचे साथीदार दगड्या-धोंड्या यांची वाडा हडप करण्याची धडपड, पैशाच्या मोहात अडकलेला गजा, तर दुसरीकडे फिल्मी अदांनी भारलेली पण गजावर मनापासून प्रेम करणारी यमी आणि या सगळ्या कथानकाचा उलगडा करणारे आबा या सर्व पात्रांचा भन्नाट विनोदी कोलाज म्हणजे गजा आला रे….नाटकाच्या शेवटी प्रेक्षकांना केवळ हसवले जात नाही, तर एक झणझणीत सामाजिक संदेशही दिला जातो. याचे संपूर्ण श्रेय लेखकाला द्यावे लागेल.
संपूर्ण नाटक एकहाती पेलणारा गजा म्हणजेच शेखर झावरे याच्या अफाट एनर्जीला सलाम करावाच लागेल. त्याला समर्थ साथ देणारी सर्व कलाकार मंडळीही तितकीच ताकदीची ठरतात. विशेषतः यमीच्या भूमिकेत तन्वी पाटील हिने स्वतःचे वेगळेपण ठळकपणे सिद्ध केले आहे. एनर्जी आणि टायमिंग ही या नाटकाची खरी ताकद असून ती रंगमंचावर प्रभावीपणे उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक कलाकाराने केला आहे. कलाकारांच्या अभिनयाइतकीच नाटकाची तांत्रिक बाजूही प्रभावी ठरते. ग्रामीण रंगभूमीवर व्यावसायिक धाटणीचे चार भव्य सेट उभे करणे, हे खरोखरच धाडसी पाऊल म्हणावे लागेल. नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा आणि वेशभूषा या सर्व बाबी प्रेक्षकांना शंभर टक्के व्यावसायिक नाट्यविष्काराचा अनुभव देतात. याचे श्रेय दिग्दर्शक आणि निर्मात्यांना द्यावे लागेल.







