चित्रलेखा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रंगकर्मींच्या पावलांची सय, त्याला संगीताची लाभणारी साथ, नेपथ्याने बहरलेला अन् प्रकाशाने उजळलेला मंच, अलिबागमधील रसिकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच पीएनपी नाट्यगृह पुन्हा एकदा त्याच दिमाखात उभे राहणार आहे. 15 जून 2022 ला आलेल्या संकटामुळे भीषण आगीत भस्मसात झालेल्या पीएनपी नाट्यगृह उभारणीचा मार्ग सुकर झाला आहे.
दुर्घटनेमुळे केवळ रसिक, कलाकारांच्याच नव्हे तर प्रत्येक अलिबागकरांच्या डोळ्यात या घटनेमुळे अश्रु तरळले. त्याचवेळी हताश झालेल्या कलाकारांना पाठबळ देत शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी खंबीरपणे उभे राहून नाट्यगृह पुन्हा उभारण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा पीएनपी नाट्यगृह कलाकार, रसिकांसाठी खुले होणार आहे. त्याप्रमाणे कामाला सुरुवात झाली आहे आणि सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा नाटक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी संगितले.
नवीन स्थानिक कलाकार निर्माण होण्यासाठी, त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी व नामवंत कलाकारांचे व्यावसायिक नाटयप्रयोग अलिबागमध्ये होण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील मोठ्या दिमाखात पीएनपी नाट्यगृह उभारले. कलाकारांच्या सांस्कृतिक विकासासाठी पीएनपी नाट्यगृहाची स्थापना करण्यात आली. त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून अनेक कलाकार सांस्कृतिक आणि तांत्रिकदृष्ट्या विकसित झाले. यामुळे हजारो कलाकारांना आत्मविश्वास मिळाला होता. तर स्थानिकांना रोजगार मिळाला.
चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नांना यश. अलिबाग तालुक्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक गुणवंत कलाकार रायगड जिल्ह्यात आहेत. या नाट्यगृहामुळे अलिबाग तालुक्यातील नागरिकांना व्यावसायिक व प्रायोगिक तत्त्वावरील नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद उपभोगता यावा. स्थानिक कलावंतांसाठी आपली कला जगासमोर आणता यावी, यासाठी चित्रलेखा पाटील अहोरात्र मेहनत घेत होत्या. त्यांच्या मेहनतीला तसेच पाठपुराव्याला यश आले असून लवरकच रसिक, कलाकारांसाठी नाट्यगृह पुन्हा उभे राहणार आहे.
पीएनपी नाट्यगृह दुर्घटनेनंतर अनेक कलाकार रंगमंचावर कला सादर करण्यास उत्सुक होते. मात्र आलेली परिस्थिती अशी होती की, कोणीही काहीही करू शकत नव्हते. मात्र कलाकारांना दिलेल्या आश्वासनानूसार नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच रंगभूमीवर नाटकांची नांदी पुन्हा सुरू होईल. खऱ्या अर्थाने कलाकारांचा थांबलेला प्रवास पुन्हा सुरु होईल.
आ. जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप