वाहतूक कोंडी हटवण्यासाठी पोलिसांची कारवाई

| श्रीवर्धन । वार्ताहर ।

शहरामध्ये मागील काही दिवसांपासून वाहतुकीची समस्या अत्यंत जटील होऊन बसली होती. शहरामध्ये एकदा जर का वाहतूक कोंडी झाली तर ती सुटण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी सुद्धा लागत होता. पर्यटकांसोबतच सहलीच्या बस गाड्या देखील खूप मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे श्रीवर्धन मधील अरुंद रस्त्यांवरती वाहतूक कोंडी वारंवार होत होती. तसेच श्रीवर्धन बाजारपेठेत बेशिस्तपणे आपल्या दुचाकी उभे करणारे दुचाकीस्वार, तसेच अनेक भाजी विक्रेते व दुकानदार आपल्या दुकानासमोर प्लॅस्टिकचे क्रेट मांडून त्यावरती भाजी विक्री करिता ठेवून रस्त्याची दोन ते तीन फूट जागा अडवत होते. याबाबत अनेक वेळा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही वेळेला नगरपरिषदेकडून कारवाई देखील करण्यात आली. परंतु नगरपरिषदेची कारवाई झाल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी दुकानदार, भाजी विक्रेते नेहमीप्रमाणे आपली भाजी रस्त्यावरतीच मांडत होते.

सहलीच्या 50 ते 60 बस गाड्या गावामध्ये येत असतात. तसेच पर्यटकांच्या चार चाकी गाड्या देखील हजारोच्या संख्येने येत असतात. शहरातील अरुंद रस्ते ही मुख्य समस्या असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होतच असते. मात्र श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी स्वतः वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस जीपमध्ये स्वतः माईक हातामध्ये घेऊन पोलीस निरीक्षक पाटील हे दुचाकी स्वारांना, त्याचप्रमाणे ज्या दुकानदारांनी व भाजी विक्रेत्यांनी आपला माल रस्त्यावर लावला आहे. त्यांना तो त्वरित हटविण्याच्या सूचना देत आहेत.

Exit mobile version