। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील छबिना यात्रा उत्सवाला पोलिसांमुळे गालबोट लागले असल्याची चर्चा आणि आरोप संपूर्ण महाड शहरात आणि तालुक्यात उघडउघडपणे होऊ लागले आहेत. या यात्रेत बाहेरून आलेल्या दुकानदारांवर अत्यंत बेजबाबदारपणाने लाठीचार्ज करण्यात आला असल्याने विरेश्वर देवस्थानसह महाडकर नागरिकांमधून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे असले बेजबाबदार अधिकारी आपल्या ऐतिहासिक महाड शहरात नको, त्यांनी त्यांच्या कामामध्ये कामचुकारपणा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी देवस्थान पंच कमिटीच्या माध्यमातून सोमवारी देवस्थानने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे. महाड शहर पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी कोणतीही शहानिशा न करता पाळण्यात केस अडकून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती यात्रेत दिली होती. त्यानंतर सर्वत्र हळहळ आणि दु:ख व्यक्त करण्यात आले.