बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका

34,972 वाहनांवर कारवाई, वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती

| पनवेल । वार्ताहर ।

महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे यांच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील बेशिस्त वाहन चालवणार्‍या 34,972 वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये धडक कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे तीन महिन्यांमध्ये महामार्गावरील अपघातांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन, धोकादायक ओव्हरटेक, लेनची शिस्त मोडण्याच्या प्रकारांमुळे अपघातांत वाढ झाली आहे. महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणामध्ये घट होण्याकरिता महामार्गावरील नेमून दिलेल्या विहित मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवण्यात येत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर कार्यवाहीबरोबरच चालकांचे प्रबोधन करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत जानेवारी ते मार्च 2023 मध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहन चालक-मालक, तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. याच अनुषंगाने महामार्गावर वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी पार्किंग स्थळे, ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक्स परिसर खालापूर टोलनाका येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात आहेत.

महामार्ग पोलीस केंद्राकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच वाहनचालकांचे केलेल्या प्रबोधनामुळे पळस्पे हद्दीत अपघातांमध्ये घट झाली आहे.

गणेश बुरकुल, पोलिस उपनिरीक्षक,
महामार्ग पोलिस केंद्र, पळस्पे

Exit mobile version