। मुंबई । प्रतिनिधी ।
वर्दीतल्या एका पोलीस अधिकाऱ्याने गतिमंद महिलेच्या असह्यतेचा गैरफायदा उचलत तिचा विनयभंग केला. हा संतापजनक प्रकार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील ताडदेव परिसरातील भाऊसाहेब हिरे उद्यानात सोमवारी संध्याकाळी घडला. यावेळी मैदानात असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्या पोलिसाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ताडदेव पोलिसांनी त्या सहाय्यक फौजदाराला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
ताडदेव येथील साने गुरुजी मार्गावर भाऊसाहेब हिरे उद्यान आहे. सार्वजनिक मैदान असल्याने नागरिक मोठ्या संख्येने तेथे येत असतात. सोमवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता एक वर्दीतला पोलीस तरुणीसोबत बसला असल्याचे नागरिकांनी पाहिले. काही वेळाने त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. या दरम्यान उद्यानात फिरायला आलेल्या स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहिली. संतापलेल्या नागरिकांनी तात्काळ आरोपी अधिकाऱ्याला चोप दिला आणि त्याला पकडून ठेवले. यानंतर त्यांनी जवळच असलेल्या ताडदेव पोलीस चौकीत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी सुरू केली.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अधिकाऱ्याने नशेत असताना ही कृत्ये केल्याचे सांगितले जात आहे. आरोपी अधिकाऱ्याची ओळख सहाय्यक फौजदार अशी झाली असून, तो मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभाग 2 मध्ये कार्यरत आहे.






