अस्वच्छतेने नागरिक हैराण
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानात सुरू असलेल्या पोलिस भरतीसाठी आलेल्या भावी पोलिसांच्या उपद्रवामुळे मैदानाच्या शेजारी राहणार्यांना चांगलाच ताप सोसावा लागत आहे. चाचणीसाठी आलेले उमेदवार रात्री अपरात्री कुठेही शौचास बसतात, यामुळे येणार्या दुर्गंधीमुळे आणि घाणीमुळे शेजारी राहणार्यांना घरात थांबणेही अवघड झाले आहे.
ही भरती प्रक्रिया 22 जानेवारी पर्यंत चालणार आहे. भरती प्रक्रियेमुळे कोणालाही त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्यात आल्याचा दावा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केला होता. परंतु काही दिवसातच याची सत्यता समोर आली असून जेलच्या मागील बाजूस राहणारे शेखर साळवी, भरत कुडाळकर, सुनंदा कुडाळकर यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.
या उमेदवारांसाठी अलिबागपासून तीन किलोमीटर अंतरावरील कुरुळ येथील क्षात्रैक्य समाजहॉल येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे; मात्र, हे उमेदवार तेथे न जाता मैदानाच्या बाजूलाच घुटमळत असतात. रात्रीचे ते तेथेच शौचास बसत असल्याने दुर्गंधी वाढू लागली आहे. अद्याप 11 दिवस शिल्लक असल्याने उर्वरीत दिवसांसाठी तरी पोलिस प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी शेजारी राहणारे कुटुंबिय करीत आहेत. या कुटुंबांनी मैदानात असलेल्या अधिकार्यांसमोर ही दुर्गंधी लक्षात आणून दिली. नगरपालिकेला सांगून ही साफसफाई केली जाईल, असे सांगितले होते. बुधवार सकाळपर्यंत ही स्वच्छता करण्यात आलेली नाही.
दुर्गंधीमुळे आम्हाला आमच्या घराच्या परिसरात वावरणेही कठीण झालेले आहे. भरतीसाठी आलेल्यांमुळे उगाचच त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात मुख्यालयात जाऊन वारंवार सांगावे लागत आहे, तरीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. – शेखर साळवी, रहिवासी
पोलिस भरतीला आलेल्या उमेदवारांसाठी पर्यायी व्यवस्था केलेली आहे, तरीही ते तिथे जात नाहीत. या मुलांकडे पैसे नसल्याने ते लॉजमध्येही राहू शकत नाही. आम्ही जनजागृती करून बाहेर राहणार्या मुलांना सूचना देऊन समज देत आहोत. – सोमनाथ घार्गे- जिल्हा पोलिस अधिक्षक