। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
ग्रामदैवत श्री देव भैरीबुवाला झाडगाव सहाणेवर रत्नागिरी पोलिसांतर्फे चार शस्त्रधारी पोलिसांनी सलामी दिली. हा क्षण अनुभवण्यासाठी शेकडो रत्नागिरीकर उपस्थित होते. ब्रिटिशांच्या काळापासून ही प्रथा सुरू असून या प्रथेला 122 वर्षे झाली. यावेळी ट्रस्टी, मानकरी, गुरव मंडळी आणि बारा वाड्यांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टच्या शिमगोत्सवाची आज रंग खेळून आणि नियोजित ग्रामप्रदक्षिणेने जल्लोषात सांगता झाली. होळीच्या रात्री 12 वाजता भैरीबुवाची पालखी वाजत गाजत मंदिराबाहेर आली आणि मध्यरात्री 12 च्या सुमारास पुन्हा मंदिरात स्थानापन्न झाली. गार्हाणे होऊन रंगतदार शिमगोत्सवाची सांगता झाली. सहाणेवर नेहमीप्रमाणे गर्दी पाहायला मिळाली. आज सहाणेवरून पालखी उठणार असल्याने सकाळपासून गर्दी वाढली. दुपारी भैरीबुवाच्या पालखी व बरोबर उभी केलेला होळीचा शेंडा या दोन्ही ठिकाणी गुरव मंडळींनी धुपारत केली. त्यानंतर गार्हाणे घालण्यात आले. त्यानंतर पोलिसांची सलामी व नंतर रंग उधळण्यात आले. उपस्थित सर्वांवर रंग उधळून श्री भैरीची पालखी शहरात रंग उधळण्यासाठी निघाली.
भक्तांमध्ये आनंदी वातावरण
कोरोना कालावधीनंतर निर्बंध शिथिल झाल्यामुळे दोन वर्षांनंतर यंदा शिमगोत्सवात अधिक आनंदी वातावरण पाहायला मिळाले आहे. बारा वाड्यांचा रखवालदार श्री भैरी नियोजित मार्गावरून रंग उधळीत निघाला आणि त्यासोबत ट्रस्टी, मानकरी, गुरव मंडळी, बारा वाड्यांतील ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने रंग खेळत होते. सावंत खोत वठारातून श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून सहाणेच्या मागील बाजूने झाडगाव नाक्यावरुन गाडीतळ येथे पालखी आली. त्यानंतर श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिर, तेथून शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे पोलिसांनीही पूजा केली. सर्वांचे रक्षण कर, असे गार्हाणे घातले. या प्रथेलाही शेकडो वर्षांची प्रथा आहे.
गावाचे गार्हाणे
पालखी धनजी नाका, राधाकृष्ण नाका, राम नाका, राम मंदिर, मारुती आळी, गोखले नाका, ढमालनीच्या पारावर पोहोचली. तिथून पुढे विठ्ठल मंदिर, हॉटेल प्रभाजवळून काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर येथे पोहोचली. खालची आळीमार्गावरून भैरीची पालखी भैरी मंदिरात रात्री पोहोचली. त्यानंतर धुपारत व गावाचे गार्हाणे होऊन शिमगा उत्सवाची सांगता झाली.
भैरीबुवाची माफी
इंग्रजांच्या राजवटीमध्ये 1910 च्या सुमारास भैरी देवाची होळी आणताना प्रथेप्रमाणे ढोल-ताशांचा गजर सुरू होता. त्यावेळी तत्कालीन ब्रिटिश पोलिस अधीक्षकाने स्वतः येऊन सर्व वाद्ये बंद केली. त्यानंतर पंधरा मिनिटांतच ब्रिटिश अधिकार्याचा घोडा जागच्या जागी दोन पायांवर उभा राहू लागला. त्यावेळी अधिकारी घोड्यावरून खाली पडला आणि त्याने भैरीबुवाची माफी मागितली. त्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी भैरीबुवाला सहाणेवर शस्त्रसलामी आणि दरवर्षी भैरीची पालखी शहर पोलिस ठाण्यात (चावडी)वर जाऊ लागली.