पोलीस परेड मैदानाभोवती तटबंदी उभारणार

शहरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न गंभीर

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे पोलीस मैदान बंदिस्त होणार आहे. या निर्णयामुळे परिसरात राहणार्‍या नागरिकांना मोकळ्या जागेचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक वापरासाठी हे मैदान अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एक कोटी 48 लाखांचा निधी मंजूर असून, या कामाला सुरुवात झाली असून, शहरात येणारे वाहनचालक पोलीस मैदानात वाहने पार्क करून खरेदीसाठी जात होते, त्यांची मोठी आता अडचण होणार आहे.

कर्जत शहरातील पोलीस ठाण्यासमोरील मैदान हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे आहे. या मैदानात कर्जत शहरातील सार्वजनिक कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमांना सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी घ्यावी लागते. त्याच मैदानात कर्जत शहरातील वाहने पार्किंग करून ठेवावीत, असे पोलिसांकडून सांगितले जाते. बाजारात गर्दी होऊ नये यासाठी हा पर्याय निवडला जात असताना आता सार्वजनिक बांधकाम विभाग आपले हे मैदान बंदिबस्त करण्याच्या तयारीत आहेत. याच मैदानात असलेल्या कर्जत पोलीस ठाणे आणि बाजूला असलेले प्रशासकीय भवन लक्षात घेता वाहने पोलीस मैदानात उभी करून सरकारी कार्यालयात लोक जात असतात. मात्र, आता पोलीस मैदान बंदिस्त होणार असेल तर मात्र वाहने कुठे पार्क करायची, हा प्रश्‍न निर्माण होणार आहे.
याच मैदानाच्या एका बाजूला पूर्वी सरकारी कर्मचारी यांच्या इमारती होत्या. त्या पाडण्यात आल्या असून, त्या इमारती पुन्हा उभ्या करण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम खाते यांनी घेतली नाही. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग मैदान बंदिस्त करण्याची घाई कशासाठी करीत आहेत, असा प्रश्‍न कर्जत शहरातील नागरिक करीत आहेत. या मैदानास दोन गेट उभारण्यात येणार असून, यासाठी 1 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बंदिस्त मैदानामुळे पोलीस कवायत, शासकीय कार्यक्रम आणि अन्य उपक्रमांसाठी या मैदानाचा उपयोग अधिक प्रभावीपणे होऊ शकतो. याशिवाय, मैदानाच्या सुशोभीकरणासाठी गवती लॉन तयार करण्यात येणार असून, महिला सुविधा केंद्र आणि टॉयलेट्स उभारण्याचा प्रस्तावदेखील आहे. संपूर्ण काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शहरातील नागरिक या निर्णयाचे स्वागत करत असले, तरी काही प्रश्‍न अद्याप सुटायचे आहेत. मैदान बंदिस्त झाल्यानंतर येथे खेळण्याच्या किंवा चालण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तसेच, वाढत्या पार्किंग समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

या मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ काही अनधिकृत टपर्‍या उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे गेटच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या टपर्‍या हटवण्यात येणार आहेत. संबंधित टपरीधारकांना याबाबत नोटिसा दिल्या आहेत. मात्र, टपरीधारकांनी पुनर्वसनाची मागणी केली असून, त्यावर प्रशासनाने कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. बंदिस्त कंपाऊंड केल्याने नागरिकांना तसेच शासकीय कामासाठी मैदान उपयोगात येऊ शकते.

अक्षय चौधरी,
शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत

Exit mobile version