अवजड वाहनांची रेलचेल
| चिरनेर | प्रतिनिधी |
नव्याने विकसित होत असलेल्या उलवे नोड परिसरात तसेच येथील खारकोपर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या जासई नाका ते गव्हाण खारकोपर मार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची मागणी येथील प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी काही प्रमाणात काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तर, काही ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. मात्र, या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. त्यामुळे खड्ड्यांचे प्रमाणही खूपच वाढले आहे.
जासई-गव्हाण रस्ता सार्वजनिक बांधकाम अलिबाग व सिडको यांच्या कात्रीत सापडला आहे. या रस्त्याबद्दल अनेक तक्रारी करूनसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही दाद मिळत नाही. या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यानंतर स्थानिक प्रवासी, रिक्षा चालक, चार चाकी वाहनधारक तसेच दुचाकी चालविणाऱ्यांना अंदाज येत नसल्यामुळे अपघातांना तोंड द्यावे लागते. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागच्या अधिकाऱ्यांची या रस्त्याच्या कामाबाबत विचारणा केली असता निधीची कमतरता असल्याचे सांगाण्यात आले. या विभागात सिडकोने भूसंपादन केलेले आहे. सिडकोचे अनेक प्रकल्प या विभागात चालू आहेत. यामध्ये प्रामुख्याने न्हावा शिवडी सी लिंक, मास हाऊसिंग प्रकल्प, विमानतळ, नेरूळ उरण रेल्वे मार्ग असे अनेक प्रकल्प या ठिकाणी चालू आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. हा रस्ता लवकरात लवकर सिडकोकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी केली आहे. यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सिडकोकडे मागणी केली होती. त्यानुसार या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सिडकोच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.
हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यातील 2 हजार 400 मीटरच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून, सहाशे मीटरचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल.
नरेश पवार,
अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
