। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे-रोहा राज्य मार्गावरील नागमोडी वळणे असलेल्या धोकादायक भिसे खिंडीत ओव्हरलोड अवजड वाहने बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भिसे खिंडीतील दोन्ही बाजूकडील चढावावरच असलेल्या धोकादायक वळणावर ही वाहने बंद पडत असल्याने वळणावर वाहने चालविताना चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या अवजड वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकार्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंडीत वळणावर वारंवार बंद पडणार्या अवजड वाहनांमुळे सद्यपरिस्थितीत भिसे खिंडीतून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. ही वाहने वळणावरच बंद पडत असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. मध्यंतरी अशा ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा ही अवजड ओव्हरलोड वाहतूक सुरू झाल्याने या अवजड वाहनांवर कायमस्वरूपी ठोस कारवाई करण्यासाठी पेण उपप्रादेशिक परिवहन खाते चालक व प्रवाशांच्या मृत्यूची वाट पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित करून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.