रक्तच्या ठीपक्यांमुळे महालक्ष्मी निवारामध्ये राहणारे नागरिक भयभीत
। माणगांव । वार्ताहर ।
माणगाव शहरातील उतेखोल वाडीत नव्याने निर्माण झालेल्या “महालक्ष्मी निवारा”या कॉम्प्लेक्स मध्ये ३ जानेवारी रात्री काहीतरी भयानक प्रकार घडला असावा. या कॉम्प्लेक्स च्या इमारत क्रमांक ३ च्या A विंग आणि B विंग चे जिने आणि टेरेस वर रक्ताचे शिंतोडे आणि ठिपके ४ जानेवारी रोजी राहणाऱ्या नागरिकांना दिसल्याने उतेखोलवाडी व महालक्ष्मी निवारा परिसरात एकच खळबळ माजली असून महालक्ष्मी निवारा कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे तेथील नागरिकांनी बोलताना सांगितले.
या महालक्ष्मी निवारा च्या सध्या ३ इमारतीमध्ये नागरिक वसाहतीत आहेत. मात्र या रहिवासी लोकांची कोणत्याही प्रकारची गृहनिर्माण संस्था (सोसायटी) अद्याप पर्यंत रजिस्टर झालेली नाही. आणि या बिल्डर कडून कॉम्प्लेक्स परिसरात लावलेले सी सी टीव्ही कॅमेरे निकामी झालेले आहेत. सदर कॅमेरे दुरुस्ती करून घ्यावे अशी मागणी रहिवासी नागरीकांनी बिल्डर आणि व्यवस्थापनाकडे करून देखील दुर्लक्ष केल्याने आज रोजी घडलेल्या प्रकाराचे गूढ उघडण्यास विलंब होते अशी माहिती स्थानिक रहिवाश्यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. तसेच या कॉम्प्लेक्स चे जबाबदार रहिवासी सलील चव्हाण उपस्थित पत्रकाराना म्हणाले की हा प्रकार कदाचित ३ जानेवारी रात्री ११ च्या दरम्यान घडला असावा! तर मग सुरक्षारक्षक कुठे होते?ही पण चिंतेची बाब आहे.
विशेष म्हणजे इमारत क्रमांक३ च्या A विंग आणि B विंग च्या जिने आणि टेरेस वर आढळलेल्या रक्तांच्या ठिपक्याप्रमाणे असे ठिपके उतेखोल वाडीची एन्ट्री व महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगड जिल्हा कार्यालयासमोरील रस्त्या पर्यंत दिसून आले आहे. प्रथमदर्शनी पाहता हे रक्त मानवी असल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकरणाची दखल घेत माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताचे नमुने गोळा करून तपासाची सूत्रे हलविली आहेत.