| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल ते पनवेलला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनचालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असताना पनवेल महापालिका प्रशासनाकडून मात्र या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या पुलावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असताना रस्त्यावरील खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. खड्डे चुकवताना दुचाकीस्वारांचा तोल जाण्याची, तर अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या वाहनांची धडक होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
शहरातील रस्त्यांच्या विकासाच्या घोषणा होत असताना महत्त्वाच्या पुलाची साधी दुरुस्तीही होत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे इतके दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे. पुलावरील खड्डे तातडीने बुजवून संपूर्ण रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतप्त वाहनचालकांकडून होत आहे.







