नवीन पनवेलमधील नागरिक हैराण
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नवीन पनवेलमध्ये जेमतेम 25 दिवसांपूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण उखडले गेल्यामुळे भर पावसात खड्यांची डागडुजी करण्याची वेळ पनवेल महापालिकेवर आली आहे. जेमतेम 25 दिवसांत डांबराला पुन्हा खड्डे पडत असतील, तर कंत्राटदाराने वापरलेल्या डांबराच्या दर्जावर पालिका प्रशासनाचे लक्ष आहे की नाही? असा प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत.
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ब आणि ड मधील खड्डे बुजविण्याचे काम पीडी इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आलेले आहे. 31 कोटी 15 लाख रूपयांच्या अंदाजित रकमेचे काम पीडीआयपीएल कंपनीने 25 कोटी रूपयांत करण्यासाठी घेतले. तब्बल 6 कोटी रूपये कमी किमतीत घेतलेले काम कंत्राटदाराने सुमार दर्जाचे केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. नवीन पनवेलमध्ये दोन वर्षापासन महानगर गॅस लिमिटेड खोदले होते. रस्ते वेळेत बुजविण्यात न आल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. पावसाळ्यापूर्वी 15 मेदरम्यान पीडीआयपीएल कंत्राटदाराने नवीन पनवेलमधील 1, 2, 3, 11, 12, 13, 14 आदी सेक्टरमध्ये रस्ते चकाचक केले. दोन वर्षे खड्ड्यांतून प्रवास केलेल्या नागरिकांना गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करताना अडथळा दर झाल्याचा आनंद होत होता; परंतु पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेला आहे. महिनाभरापूर्वी बुजवलेले खड्डे जून महिन्यातील पावसात पुन्हा उखडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवकचे पदाधिकारी आदित्य जानोरकर यांनी या प्रकाराची तक्रार आपलं सरकार ॲपवर केली आहे.
महिनाभरापूर्वी डांबरीकरण केलेले खड्डे 25 ते 30 दिवसांत पुन्हा तसेच उखडले जात असतील तर पालिकेने विकासाच्या मोठ्या गप्पा मारू नयेत. कोट्यवधी रूपयांचे डांबरीकरण एका महिन्यात उखडले, याबद्दल प्रशासनाने कंत्राटदारावर कारवाई करायला पाहिजे.
– आदित्य जानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, युवक काँग्रेस