आंदोलनाच्या मशालीच नव्हे, शेतकर्‍यांच्या चुलीही पेटविणारे प्रभाकर…!

अ‍ॅड. राकेश नारायण पाटील

रायगडचे भाग्यविधाते, गरिबांचे कैवारी, अन्यायाविरोधात आवाज उठविणारे स्व. प्रभाकर पाटील (भाऊ) यांची आज पुण्यतिथी. सर्वसामान्यांना परिवर्तनाची दिशा दाखविली ती भाऊंनीच… तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचविली तीसुद्धा भाऊंनीच. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठीच हा लेखप्रपंच…
रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकास साधण्यास शेतकर्‍यांचे थोर नेते क्रांतिसूर्य नारायण नागू पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र भाई अ‍ॅड. दत्ता आणि प्रभाकर पाटील यांचे योगदान मोलाचे ठरते. जिल्ह्यात शेतीच्या मालकी हक्कांच्या चळवळीच्या संघर्षमयी संस्कारात प्रभाकर पाटील यांचे बालपण गेले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांना प्रत्यक्ष सहवास लाभल्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता, हे त्यांच्या कार्यावरुन लक्षात येते.
शेतकर्‍यांची सावकारीच्या जाचातून मुक्ती केल्यानंतर शेतकर्‍यांना केवळ शेती करण्यावरच अवलंबून न ठेवता शेतकर्‍यांच्या मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या कुटंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करावा, ही विवेकी दूरदृष्टी ठेवून प्रभाकर पाटील यांनी राजकारणाच्या मााध्यमातून सिद्ध करुन दाखविले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांचे योगदान मोलाचे ठरते. वडील नारायण नागू पाटील हे स्वातंत्र्यापूर्वी विधिमंडळाचे जिल्ह्यातील आमदार होते. पण, केवळ वडील आमदार आहेत, म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी कधीही राजकारण केले नाही.
आंदोलने, मोर्चे यांचे नेतृत्व जरी त्यांनी केले असले, तरी त्यांनी जिल्ह परिषदेच्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्याचे मूळ माध्यम असणारे शिक्षण त्यांनी खेडोपाड्यात पोहोचविले. गोरगरीब शेतकर्‍यांची मुले शिक्षण घेऊ लागली, त्यावेळी देशाच्या सत्तेत असणार्‍या काँग्रेसी नेतृत्वाला जे कार्य जमले नाही, ते कार्य प्रभाकर पाटील यांनी केले. ज्या गावामध्ये बैलगाडी जाऊ शकत नव्हती, अशा दुर्गम गावामध्ये प्रभाकर पाटील यांनी प्राथमकि शाळा सुरु करुन सर्वसामान्यांना परिवर्तनाची दिशा दाखविली.
जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटील या दोन भावांचा दबदबा होता. दत्ता पाटील यांनी आमदारकीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रश्‍न विधिमंडळात गाजवले आणि वाजवलेही; परंतु, त्यांना आपली राजकीय अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी प्रभाकर पाटील यांची मोलाची साथली लाभली, हे सांगावयास नको. जे परिस्थितीच्या अभावी शिक्षण घेऊ शकले नाहीत, त्यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या, तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वार्‍यावर न सोडता, त्यांना त्यांच्या शैक्षणिक दर्जानुसार नोकर्‍या देण्याचे क्रांतिकारी कार्य प्रभाकर पाटील यांनी केले. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे, खारेपाट विभागात आज हजारो निवृत्त शिक्षक याची साक्ष देतात.
शेकापक्षासाठी किंवा पक्षाच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी कधी कोणावरही अन्याय केला नाही. त्यांनी प्रत्येकाकडे माणूस म्हणूनच पाहिलं, म्हणूनच निवडणुकांमध्ये शेकापक्ष ग्रामीण भागात आजही आपली अस्मिता टिकवून आहे.
कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ नावाच्या कवितेतल्या ओळी आजही आठवतात- ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापाण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले.’ या ओळींचा सारांश हेच सांगतो की, चूल केवळ पाण्याच्या पुरामुळे भिजून ओली झाल्यामुळे विझली नसून, घरात शिजवण्यासाठी अन्नच नसल्यामुळे ती विझली…!
शेकापच्या झेंड्याखाली प्रभाकर पाटील यांनी अन्यायाविरोधात आंदोलनामध्ये सर्वसामान्यांच्या हातात केवळ आंदोलनांच्या मशालीच दिल्या नाहीत, तर त्यांच्या चुली कायमस्वरुपी कशा पेटत राहतील, हा दूरदृष्टीचा विचार प्रथम त्यांनी केला.

Exit mobile version