प्रदीप कुरुलकर अडकले हनीट्रॅपमध्ये

चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड

। पुणे। वृत्तसंस्था ।

एटीएसचे अधिकारी सध्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांची कसून चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. केवळ प्रदीप कुरूलकरच नव्हे तर भारतीय गुप्तचर खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दिघी येथील अभियांत्रिकी संशोधन व विकास संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना ३ मे रोजी ‘एटीएस’ने अटक केली होती. कुरुलकर यांच्याविरोधात ‘डीआरडीओ’च्या दक्षता आणि सुरक्षा विभागाचे संचालक कर्नल प्रदीप राणा यांनी तक्रार केलेली आहे.

कुरूलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले असले तरी संबंधित महिलेने त्यांना ब्लॅकमेल केले नव्हते. या महिलेने कुरुलकर यांच्याशी प्रेमाने आणि गोडगोड बोलून माहिती काढून घेतली. प्रदीप कुरुलकर यांना ज्या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवले तिने गुप्तचर खात्यातील एका अधिकाऱ्याशीही संपर्क साधला होता. एटीएसचा जो अधिकारी महिलेच्या संपर्कात आला होता, त्यानेदेखील कोणती गोपनीय कागदपत्रं पाकिस्तानला दिली आहेत का, याचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकऱ्याचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे. या मोबाईलमधील बरीच माहिती डिलीट करण्यात आली होती. त्यामुळे हा डेटा परत मिळवण्यासाठी अधिकाऱ्याचा फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंतच्या चौकशीत समोर आलेली माहिती पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना दिली आहे. ज्या मोबाईल नंबरचा वापर करुन प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये फसवण्यात आले, त्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर यांच्याकडून संदेशांची देवाण-घेवाण झालेले संशयित मेल आयडी पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

Exit mobile version