अलिबाग समुद्रकिनाऱ्याची प्रशांत नाईक यांच्याकडून पाहणी

निवारा शेडच्या तातडीच्या दुरुस्तीचे निर्देश

। अलिबाग | प्रतिनिधी ।

अलिबागच्या पर्यटनाची ओळख अधिक भक्कम करण्यासाठी आणि पर्यटकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अलिबाग नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी आज अलिबाग समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली. यावेळी पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडसह विविध सोई-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले.

अलिबाग नगर परिषदेच्या 22 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत समुद्रकिनाऱ्यावरील निवारा शेड नुकसानग्रस्त झाल्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्या अनुषंगाने या विषयाची तातडीने दखल घेत प्रशांत नाईक यांनी प्रत्यक्ष समुद्रकिनारी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या निवारा शेडची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे निर्देश दिले. यावेळी समुद्रकिनाऱ्यावरील बसण्याची व्यवस्था, स्वच्छता, पर्यटकांसाठी उपलब्ध इतर सुविधा आणि परिसराची स्थिती यांचाही आढावा घेण्यात आला.

प्रशांत नाईक यांनी सांगितले की, सर्वसाधारण सभेत उपस्थित सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची केवळ नोंद न घेता त्यावर प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तक्रारीची वाट न पाहता आज स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून, निवारा शेड लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले, “अलिबाग हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून वर्षभर देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. पर्यटन हा स्थानिकांच्या रोजगाराचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील प्रत्येक सुविधा सुरक्षित, सुस्थितीत आणि पर्यटकांसाठी उपयुक्त ठेवणे ही नगर परिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. ‘ब्रँड अलिबाग’ची प्रतिमा अधिक सक्षम करण्यासाठी पर्यटन सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीला प्राधान्य दिले जाईल.” पर्यटनस्थळावरील कोणतीही सुविधा दीर्घकाळ बंद किंवा नुकसानग्रस्त राहणार नाही, यासाठी नियमित पाहणी, आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नगर परिषद सातत्याने कार्यरत असून, पर्यटन विकासाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version